संगमनेर : राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना अत्यंत कमी दाबाने व अवेळी वीज मिळत आहे. शालेय विद्य

संगमनेर : राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना अत्यंत कमी दाबाने व अवेळी वीज मिळत आहे. शालेय विद्यार्थ्यांचा परीक्षांचा काळ सुरू आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा बंद होत आहे. भर उन्हाळ्यामध्ये ग्रामपंचायतींसाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कट केल्याने अनेक नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहे या सर्व गलथान कारभार विरोधात डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या वतीने वीज कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ.जयश्री थोरात, अजय फटांगरे,नवनाथ आरगडे, पद्माताई थोरात, प्रमिला अभंग, योगिता सातपुते,प्रदीप हासे, राजू खरात, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब वाळके, रोहिणी गुंजाळ यांच्यासह सुमारे 100 कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, सध्या राज्यभरात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची गरज वाढली आहे. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत, नागरिकांना सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अशी परिस्थिती असताना सरकारने मात्र गावोगावी असलेल्या पाणीपुरवठा योजनांची लाईट बंद केली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हाळ्यात महिलांचे मोठे हाल होत आहे. गुंजाळवाडी, वडगाव पान,समनापुर, खांडगाव यांसह विविध गावांमधील पाणीपुरवठा योजनांची वीज कट झाल्याने पाणीपुरवठा योजना बंद झाल्या आहेत त्यामुळे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी महिला व नागरिकांना मोठा त्रास होत आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे मात्र त्याच्याकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष होत असून हे सरकार शेतकरी विरोधी आहे. महागाई व गॅस वाढीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे.
तरी महावितरण विभागाने वीज वितरणासाठी प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी ,शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यास, दवाखाने या सर्व गोष्टींचा अभ्यास करून नियमित व वेळेत वीज पुरवठा करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
मुख्य कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांनी येत्या एक-दोन दिवसांमध्ये तातडीने वीजपुरवठा सुरळीत करू असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

COMMENTS