तेहरान : इराणचे नव्याने नियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक दावे समोर येत आहेत. काही आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार ते

तेहरान : इराणचे नव्याने नियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक दावे समोर येत आहेत. काही आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार ते एका हवाई हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर सध्या कोमामध्ये असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचा एक पाय कापावा लागल्याचेही काही सूत्रांचे म्हणणे आहे.
वृत्तांनुसार 56 वर्षीय मोजतबा खामेनेई हे त्या हवाई हल्ल्यात जखमी झाले, ज्यामध्ये त्यांचे वडील आणि इराणचे माजी सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. हल्ल्यानंतर त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेत तेहरानमध्ये उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती मिळते. मात्र, नेमक्या कोणत्या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत भाष्य केले आहे. एका मुलाखतीत त्यांना खामेनेई जिवंत आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी ते कदाचित जिवंत असावेत; मात्र त्यांना गंभीर दुखापती झाल्या असण्याची शक्यता आहे, असे सांगितले. सर्वोच्च नेतेपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत ट्रम्प यांची ही पहिली प्रतिक्रिया मानली जात आहे. काही अहवालांनुसार या हल्ल्यात खामेनेई यांच्या शरीराला मोठे नुकसान झाले असून त्यांना पोट किंवा यकृताला गंभीर दुखापत झाल्याचाही दावा केला जात आहे. सध्या तेहरानमधील एका प्रमुख रुग्णालयात कडेकोट सुरक्षेत त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले जाते. ज्या विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तो विभाग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला असून तेथे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.
इराणच्या सरकारी माध्यमांनी नेतृत्वात सातत्य असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. मोजतबा खामेनेई यांनी सत्ताग्रहणानंतर दिलेला पहिला संदेश म्हणून एक निवेदन प्रसारित करण्यात आले. मात्र हा संदेश स्वतः त्यांनी न वाचता एका वृत्तवाहिनीवरील निवेदकाने वाचून दाखवला. या संदेशात इराण आपल्या नागरिकांच्या मृत्यूचा बदला घेईल, तसेच प्रादेशिक समुद्री मार्गांवरील कारवाया सुरूच ठेवेल, असे संकेत देण्यात आले आहेत. होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याची धमकीही या संदेशात दिल्याचे सांगितले जाते. विश्लेषकांच्या मते, इराणची राजकीय व लष्करी व्यवस्था अशी रचलेली आहे की ती सक्रिय सर्वोच्च नेत्याशिवायही काही काळ कार्य करू शकते. तथापि, मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत आणि जखमांबाबत करण्यात येणार्या अनेक दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. इराणमध्ये इंटरनेटवरील निर्बंध आणि सुरक्षेच्या कारणांमुळे अधिकृत माहिती मर्यादित प्रमाणातच बाहेर येत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतची खरी स्थिती अद्याप अस्पष्टच आहे.

COMMENTS