Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हर्षलने सीए पदाला घातली गवसणी

कडा ।प्रतिनिधीभाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली कवी नारायण सुर्वे यांच्या या ओळीप्रमाणे आयुष्याचा हिशोब मांडताना अनेक कुटुंबांचे जीवन संघर

वसंतदादा पाटील महाविद्यालयाचा अनिल खेडकर करणार युवा संसदेत बीड जिल्ह्याचे नेतृत्व
रेणुका गडावरील पार्किंग वादातून भाविकांना मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
कशेडी घाटात कोसळली दरड; 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले.

कडा ।प्रतिनिधी
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली कवी नारायण सुर्वे यांच्या या ओळीप्रमाणे आयुष्याचा हिशोब मांडताना अनेक कुटुंबांचे जीवन संघर्षातच व्यतीत होते. सुख-दुःखाच्या वादळातून मार्ग काढत स्वप्नपूर्तीसाठी सुरू असलेली धडपड अखेर यशाच्या शिखरावर पोहोचते. अशाच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आष्टी तालुक्यातील हर्षल ज्ञानदेव म्हस्के याने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ही अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण करून कुटुंबासह परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
आष्टी तालुक्यातील दुष्काळग्रस्त व डोंगराळ गहूखेल परिसरातील शेतकरी कुटुंबात हर्षलचा जन्म झाला. वडील ज्ञानदेव म्हस्के यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. अल्पशा शेतीवर उदरनिर्वाह कठीण होत असल्याने त्यांनी आयटीआय अंतर्गत इलेक्ट्रिशियनचे शिक्षण पूर्ण करून पुणे व हैदराबाद येथे नोकरी केली. सध्या ते सुपा येथील खासगी कंपनीत इलेक्ट्रिशियन म्हणून कार्यरत आहेत. अडचणींच्या परिस्थितीतही मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे, हा निर्धार त्यांनी कायम ठेवला. त्याच जिद्दीचे फलित म्हणजे मुलगा हर्षलने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत सीए परीक्षेत यश संपादन केले. पुण्यासारख्या महागड्या शहरात राहून त्याने डेक्कन, पुणे येथील मालानी-सोमानी-चांडक असोसिएट्स येथे आर्टिकलशिप पूर्ण केली. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने पहिल्याच प्रयत्नात सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. हर्षलच्या यशामागे आई-वडिलांचे अथक कष्ट आहेत. आईने शिवणकाम करून संसाराला हातभार लावला, तर वडिलांनी अतिरिक्त वेळ काम करून मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ उभे केले. मर्यादित उत्पन्न असतानाही शिक्षणावर कधी तडजोड केली नाही. कोरोना महामारीदरम्यान ज्ञानदेव म्हस्के गंभीर आजारी पडले. उपचारासाठी मोठा खर्च झाला व आर्थिक संकट ओढावले. मात्र परिस्थिती कितीही कठीण असली तरी मुलांचे शिक्षण थांबता कामा नये, हा निर्धार कायम ठेवत त्यांनी मुलाच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. हर्षलने प्राथमिक ते दहावीपर्यंतचे शिक्षण सावेडी येथे पूर्ण केले. इयत्ता 11 वी व 12 वीचे शिक्षण अहमदनगर येथे निवासी पद्धतीने घेतले. त्यानंतर न्यू आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयातून बी.कॉम. पदवी पूर्ण करून सीए अभ्यासक्रमाला सुरुवात केली आणि अखेर यश संपादन केले. वडिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आमच्या शिक्षणासाठी खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून शिक्षणातून काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न केला. आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने मेहनत घेतली तर यश निश्चित मिळते, असे मत नवनियुक्त सीए हर्षल म्हस्के यांनी व्यक्त केले. हर्षलच्या या यशामुळे कडा परिसरासह आष्टी तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संघर्षातून उभा राहिलेला हा यशस्वी प्रवास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

COMMENTS