सांस्कृतिक सादरीकरणातून छत्रपती शिवरायांच्या शौर्याला अभिवादनकोपरगाव : संजीवनी अकॅडमीच्या प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पा

सांस्कृतिक सादरीकरणातून छत्रपती शिवरायांच्या शौर्याला अभिवादन
कोपरगाव : संजीवनी अकॅडमीच्या प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. ‘शिवगर्जना – स्वराज्याची पुकार’ या भव्य व प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांतून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, कर्तृत्व आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाला भावपूर्ण अभिवादन केले. शाळेच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या संमेलनातून स्वराज्याच्या प्रेरणेतून राष्ट्रघडणीकडे वाटचाल करण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास संजीवनी शिक्षण समूहाचे व्यवस्थापकीय विश्वस्त अमित कोल्हे, कलावतीताई नितिनदादा कोल्हे, पूनम दीपक विसपुते, संचालिका डॉ. मनाली कोल्हे तसेच शैक्षणिक मार्गदर्शन विभागाचे प्रमुख डॉ. आर. एस. शेंडगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण संवादफेक, प्रभावी अभिनय, तालबद्ध नृत्य आणि भावपूर्ण सादरीकरणाचे कौतुक केले. सांस्कृतिक कार्यक्रमांमधून बालकलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी प्रवास रंगमंचावर जिवंत केला. मुघलांनी उद्ध्वस्त केलेले पुणे, जिजाऊ मातेचे पुण्यात आगमन, शिवरायांचा जन्म व बालपण, जिजाऊंनी दिलेले संस्कार, गणपती मंदिराची स्थापना, अफजलखानाचा वध, स्वराज्य उभारणीतील ऐतिहासिक टप्पे, संत तुकाराम महाराजांची भेट, आग्र्याहून सुटका, शिवराज्याभिषेक, तानाजी मालुसरे यांचा पराक्रम तसेच विद्यार्थ्यांना दिलेला महाराजांचा संदेश-हे सर्व प्रसंग नाट्य, गीत आणि नृत्याच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर करण्यात आले. अशा उपक्रमांसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. नितिनदादा कोल्हे आणि व्यवस्थापकीय विश्वस्त अमित कोल्हे यांचे सातत्यपूर्ण पाठबळ लाभत असल्याचे संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजीवनी अकॅडमीच्या प्राचार्या अनुश्रिता सिंह आणि मुख्याध्यापिका अपर्णा फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक विभागाच्या समन्वयिका स्वप्नाली वालझडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS