बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका दक्षिण कोरियन नागरिक महिलेसोबत गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार उघ
बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका दक्षिण कोरियन नागरिक महिलेसोबत गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एअर इंडियाच्या ग्राउंड स्टाफमध्ये कार्यरत असलेल्या मोहम्मद अफ्फान अहमद या कर्मचार्याला अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दक्षिण कोरियातील 32 वर्षीय व्यावसायिक महिला पर्यटक व्हिसावर भारतात आली होती. ती सोमवारी, 19 जानेवारी रोजी आपल्या देशात परतण्यासाठी बंगळुरू विमानतळावर दाखल झाली होती. टर्मिनल-2 येथे सीआयएसएफची सुरक्षा तपासणी आणि इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एका व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला. संबंधित व्यक्तीने स्वतःची ओळख विमानतळ कर्मचारी म्हणून करून तिचा बोर्डिंग पास तपासला. महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्या चेक-इन सामानात अडचण असल्याचे सांगत पुन्हा तपासणी आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने मॅन्युअल तपासणीची गरज असल्याचे सांगून तिला विमानतळातील पुरुषांच्या शौचालयाजवळ नेले. तेथे तपासणीच्या नावाखाली तिच्याशी अयोग्य पद्धतीने वर्तन करण्यात आले. या दरम्यान आरोपीने अनेक वेळा अयोग्य स्पर्श केल्याचा तसेच तिच्या खाजगी अवयवांना हात लावल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकाराला विरोध केल्यानंतर आरोपीने तिला मिठी मारून ‘धन्यवाद’ म्हणत तिथून निघून जाण्याची परवानगी दिली, असेही महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. घटनेनंतर संबंधित महिलेने तत्काळ विमानतळ प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. प्रशासनाने याची दखल घेत पोलिसांना माहिती दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मोहम्मद अफ्फान अहमद याला अटक केली आहे. सध्या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था आणि कर्मचार्यांच्या पार्श्वभूमी तपासणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे देशाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

COMMENTS