दुसरी नोटीस बजावली, माघ मेळ्यातून कायमस्वरूपी वगळण्याचा इशाराप्रयागराज : प्रयागराज येथील माघ मेळ्यात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद आणि मेळा प्रशास

दुसरी नोटीस बजावली, माघ मेळ्यातून कायमस्वरूपी वगळण्याचा इशारा
प्रयागराज : प्रयागराज येथील माघ मेळ्यात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद आणि मेळा प्रशासन यांच्यातील वाद अधिकच चिघळताना दिसत आहे. अवघ्या 48 तासांच्या आत प्रशासनाने अविमुक्तेश्वरानंद यांना दुसरी कारणे दाखवा नोटीस पाठवून, मेळ्यातून कायमस्वरूपी वगळण्याचा इशारा दिला आहे.
या नोटीसमध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी आपत्कालीन व्यवस्थेसाठी राखीव असलेल्या पांटून पुलावरील बॅरियर तोडणे, तसेच परवानगीशिवाय पालखी व बग्गी घेऊन संगमाकडे जाण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कृतींमुळे चेंगराचेंगरीचा धोका निर्माण झाला असून, एकूणच मेळ्याची सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. दुसर्या नोटीसमध्ये दोन मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. पहिल्या मुद्द्यानुसार, अविमुक्तेश्वरानंद यांच्या कृतीमुळे भाविकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला. दुसर्या मुद्द्यात, त्यांनी स्वतःला ‘शंकराचार्य’ म्हणून संबोधून मेळ्यात फलक लावल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 14 ऑक्टोबर 2022 च्या आदेशाचा हवाला देत, अशा पदनामावर न्यायालयीन मर्यादा असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. 24 तासांत समाधानकारक उत्तर न दिल्यास संस्थेला दिलेली जमीन व सुविधा रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, अविमुक्तेश्वरानंद यांचे माध्यम प्रभारी शैलेंद्र योगी राज यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर टीका केली आहे. नोटीस पंडालच्या मागील बाजूस गुपचूप चिकटवण्यात आली असून, ती मागील तारखेची असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा दावा करत, नोटीसीचे उत्तर तयार असून लवकरच ते सादर केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याआधी सोमवारी मध्यरात्री मेळा प्रशासनाचे अधिकारी नोटीस घेऊन शिबिरात पोहोचले होते; मात्र शिष्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी पहिली नोटीस शिबिराच्या प्रवेशद्वारावर चिकटवण्यात आली. त्या नोटीसीला अविमुक्तेश्वरानंद यांनी आठ पानी उत्तर पाठवून, नोटीस मागे न घेतल्यास मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही दिला होता.
मौनी अमावस्येच्या घटनेपासून संघर्ष तीव्र
18 जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी पालखीतून स्नानासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना थांबवले. पायी जाण्याचा आग्रह धरल्याने शिष्यांशी धक्काबुक्की झाली. या घटनेनंतर संतप्त अविमुक्तेश्वरानंद यांनी शिबिराबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतरच प्रशासन आणि त्यांच्या समर्थकांमधील तणाव अधिक तीव्र झाला आहे.

COMMENTS