Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किडनी तस्करीचे जाळे नऊ राज्यांत पसरले

तामिळनाडू सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापनाचंद्रपूर ः देशभरात चर्चेत असलेल्या कथित ‘हाय-प्रोफाइल’ किडनी तस्करी प्रकरणाच्या तपासात धक्कादा

गुरुवर्यांच्या हस्ते झालेला सत्कार सेवाकार्याला बळ देणारा
कुठे अडविले, कुठे तोडले बॅरिकेटस्
तरुणांनी नौकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा – बी.व्ही.मस्के

तामिळनाडू सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना
चंद्रपूर ः देशभरात चर्चेत असलेल्या कथित ‘हाय-प्रोफाइल’ किडनी तस्करी प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत असून, या रॅकेटचे धागेदोरे किमान नऊ राज्यांपर्यंत पसरल्याचे उघड झाले आहे. चंद्रपूर पोलिसांनी सादर केलेल्या तपास निष्कर्षांच्या पार्श्‍वभूमीवर तामिळनाडू सरकारने आरोग्य सेवा संचालनालयाच्या अखत्यारीत उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली असून, समितीने तपासकार्याला सुरुवात केली आहे.
या प्रकरणातील प्रमुख संशयित डॉक्टर राजरत्नम गोविंदास्वामी यांना चंद्रपूर पोलिसांनी फरार घोषित केले असले तरी, तामिळनाडू आरोग्य विभागाच्या पथकाने अलीकडेच चेन्नईतील स्टार किम्स रुग्णालयात त्यांची व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने गोविंदास्वामी यांना ट्रान्झिट जामीन मंजूर करून चंद्रपूर न्यायालयात हजर राहून नियमित जामीन अर्ज करण्याची मुभा दिली आहे. मात्र, या आदेशाची प्रमाणित प्रत अद्याप प्राप्त झालेली नसून, त्यांच्या प्रत्यक्ष हजेरीची प्रतीक्षा असल्याचे चंद्रपूर पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक (एसआयटी) सध्या कर्नाटकातील बेंगळुरू येथे राहणार्‍या एका पीडित महिलेसह ज्या रुग्णावर तिचे मूत्रपिंड प्रत्यारोपित करण्यात आले, त्या व्यक्तीचा शोध घेत आहे. याशिवाय, तिरुचिरापल्ली (त्रिची) येथील एका रुग्णालयात मूत्रपिंड काढण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झालेल्या बांगलादेशी नागरिकाच्या प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे.
या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय असलेला ‘डॉ. कृष्णा’ या टोपणनावाने ओळखला जाणारा रामकृष्ण सुंचू याने चंद्रपूर सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. नागपूर येथील वकिलामार्फत दाखल करण्यात आलेल्या या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. मिंथूर येथील पीडित रोशन कुळे यांच्या तक्रारीवरून हे प्रकरण उघडकीस आले असून, त्यांच्या माहितीनुसार सुंचूला सोलापूर येथून अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीतील चौकशीनंतर त्याला 12 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

आंतरराज्य समन्वयाचा प्रश्‍न ऐरणीवर
दिल्लीतील आणखी एक प्रमुख संशयित आरोपी डॉक्टर रविंद्रपाल सिंग यांचा जामीन अर्ज चंद्रपूर न्यायालयाने फेटाळल्यानंतर ते बेपत्ता झाल्याची माहिती आहे. त्यांचा मोबाईल फोन बंद असून, त्यांच्या शोधासाठी व अटकेसाठी पोलिसांनी स्वतंत्र विशेष पथके तयार केली आहेत. या प्रकरणामुळे अवयव तस्करीविरोधी यंत्रणांची कार्यक्षमता, आरोग्य क्षेत्रातील गैरप्रकार आणि आंतरराज्य समन्वयाचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आगामी तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS