कल्याण डोंबवलीत 9 तर अहिल्यानगरमध्ये दोघांचा समावेशमुंबई ः राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघार

कल्याण डोंबवलीत 9 तर अहिल्यानगरमध्ये दोघांचा समावेश
मुंबई ः राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेतूनच राजकीय समीकरणे स्पष्ट होऊ लागली आहेत. अनेक ठिकाणी थेट लढती टळत असून, बिनविरोध विजयांची मालिकाही सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मतदानाआधीच आपली ताकद दाखवून देत 9 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तर अहिल्यानगरमध्ये दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे 5, तर शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. 122 सदस्यांच्या सभागृहात सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 62 जागांच्या दिशेने महायुतीने ठोस पाऊल टाकले असून, उर्वरित निवडणुकीतही आघाडी कायम राहण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्यामागे पक्षाच्या संघटनात्मक तयारीचे आणि नियोजनाचे प्रतिबिंब दिसून येत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रणनीतीमुळे ही यशस्वी घोडदौड शक्य झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांची भूमिका निर्णायक ठरल्याचेही मानले जात आहे. कल्याण-डोंबिवलीतील विविध प्रभागांत भाजपच्या उमेदवारांना विरोध न झाल्याने बिनविरोध निवडींची संख्या वाढली आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेंकर, मंदा पाटील यांच्यानंतर प्रभाग 24-ब मधून ज्योती पवन पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे भाजपच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची संख्या पाचवर पोहोचली आहे. शिवसेना शिंदे गटाकडूनही कल्याण-डोंबिवलीत प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली आहे. पॅनल क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी, तर प्रभाग 28-अ मधून हर्षल राजेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाली. कल्याण-डोंबिवलीपुरतेच नव्हे, तर राज्यातील इतर महापालिकांमध्येही महायुतीला बिनविरोध विजय मिळत आहेत. भाजपने धुळे महापालिकेत दोन, पनवेलमध्ये एक अशी एकूण आठ जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाने केडीएमसीत चार आणि जळगावमध्ये एक जागा बिनविरोध मिळवली आहे. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अहिल्यानगरमध्ये एक जागा बिनविरोध मिळाली आहे. एकूणच राज्यभरात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीच्या 15 जागा बिनविरोध झाल्याने आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीची स्थिती मजबूत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
अहिल्यानगरमध्ये दोन उमेदवार बिनविरोध
अहिल्यानगर शहरात होत असलेल्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसचे कुमार वाकळे आणि त्यांच्यासोबत प्रकाश भागानगरे बिनविरोध निवडून आले आहेत. आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून यादिवशी आणखी तीन उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

COMMENTS