Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

राज्यात इच्छुक उमेदवारांचा संताप

उमेदवारी अर्ज न मिळाल्याने गोंधळ; छ.संभाजीनगर, नाशिक, पुण्यात महायुती तुटलीमुंबई/पुणे ः राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळ

बिनविरोध नगरसेवक चौकशीच्या फेर्‍यात
राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी आज मतदान
जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर !

उमेदवारी अर्ज न मिळाल्याने गोंधळ; छ.संभाजीनगर, नाशिक, पुण्यात महायुती तुटली
मुंबई/पुणे ः राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. मात्र इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्याने मोठा संताप झाल्याचे चित्र दिसून येत होते. तर दुसरीकडे युती आणि आघाड्यामध्ये मोठी फूट पडल्याचे वास्तव देखील दिसून आले.
उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात अनेक महापालिकांमध्ये युती करण्यावर एकमत झाले नाही. मात्र मराठवाड्यात महायुतीला तडा गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. छत्रपती संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणी महापालिकेत दोन्ही पक्षांनी स्वबळाची घोषणा केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून महायुतीत अपेक्षित जागा मिळत नसल्याने अनेक ठिकाणी स्थानिक नेते व पदाधिकार्‍यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच, अजित पवार गटानेही छत्रपती संभाजीनगरसह, जालना, नांदेड अन् परभणीत स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. म्हणजेच, आता महायुतीतील तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, मालेगावात युती तुटली आहे. संभाजीनगरमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतली युती तुटली. भाजपचा हट्ट आणि अंहकार यामुळेच युती टिकू शकली नाही, असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी केला.
ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. यामुळे ठाकरे गट व मनसेत अनेक ठिकाणी नाराजी उफाळून आली आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक 114 शिवसेना ठाकरे गटाला सुटल्यामुळे मनसेकडून इच्छूक असलेल्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर नाराज झाल्यात. त्यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिंदे गटाच्या उमेदवाराचा एबी फॉर्मची चोरी
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना पुण्यात राजकीय खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेनेकडून (शिंदे गट) इच्छूक उमेदवार पद्मा शेळके यांनी त्यांचा अधिकृत एबी फॉर्म दुसर्‍याच कुणीतरी चोरून नेल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. पक्षाने आपल्याला उमेदवारी जाहीर केली होती, मात्र फॉर्म हातात येण्यापूर्वीच तो गायब झाल्याने पद्मा शेळके यांनी टाहो फोडला.

18 केसेस घेणार्‍या दिव्या मराठेंचा संताप
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असून गेल्या 18 वर्षांपासून पक्षासाठी रक्त आटवणार्‍या आणि आंदोलनांमध्ये अंगावर 18 केसेस ओढवून घेणार्‍या निष्ठावंत कार्यकर्ती दिव्या उल्हास मराठे यांना पक्षाने डावलल्यामुळे त्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. प्रबळ उमेदवार असतानाही एका नवख्या उमेदवाराला संधी दिल्याचा आरोप करत दिव्या मराठे यांनी आता थेट प्रचार कार्यालयात धडक देत स्थानिक नेतृत्तवावर हल्ला चढवला. तर पक्षासाठी नोकरी सोडली. खस्ता खाल्ल्या. मात्र, ऐनवेळेस डावलले, असा आरोप त्यांनी केला आहे.  


नागपुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तोडफोड
नागपुरात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे मोठी तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी सविस्तर माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.

’मातोश्री’बाहेर इच्छुकांनी केला रोष व्यक्त
ठाकरे गटातर्फे बंडखोरी टाळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात येत होते, मात्र मंगळवारी नाराज इच्छुक उमेदवारांचे जत्थेच्या जत्थे मातोश्रीवर येऊन आदळत असल्याचे चित्र होते. यापैकी अनेकांनी यावेळी पक्षावर रोष व्यक्त करत आम्ही काय नुसते झेंडेच लावायचे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला. पक्षाने प्रभाग क्रमांक 202 मधून मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिली आहे. श्रद्धा जाधव यांनी आपला मुलगा पवन जाधव याला उमेदवारी देण्याचा आग्रह धरला. त्यासाठी त्यांनी सोमवारी मातोश्रीत ठाण मांडले. पण उद्धव ठाकरे यांनी पवनच्या जागी श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देऊ केली. पण आता श्रद्धा जाधव यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांच्या भागातील शिवसैनिक प्रचंड संतापल्याचे चित्र आहे.

COMMENTS