विटा शहरातील एका भिकार्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याच्या प्रकाराने खळबळ उडवून दिली आहे.
विटा / प्रतिनिधी : विटा शहरातील एका भिकार्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याच्या प्रकाराने खळबळ उडवून दिली आहे. या भिकार्याला तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने उपचारासाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, येथील लेंगरे रोडवरील भैरवनाथ थिएटरच्या समोरील सुदर्शन कॉम्प्लेक्सच्या खाली एक भिकारी गेल्या दोन-तीन दिवसापासून सातत्याने निस्तेज बसलेला दिसून येत होता. याबाबत या कॉम्प्लेक्सच्या एका दुकानच्या मालकाने येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉ. विशाल नलवडे यांना फोन करून याबाबतची कल्पना दिली. त्यांनी ग्रामीण रुग्णालयाची अॅम्ब्युलन्स त्या ठिकाणी पाठवली. याचवेळी विट्यातील शासकीय कोविड केअर सेंटरचे प्रमुख डॉ. अभिजित निकम आणि डॉ. विजय सूर्यवंशी यांना ही बाब समजली. त्यांनी अंदाजे 55 ते 60 वय असलेल्या काठी घेऊनही चालू न शकणार्या या भिकार्याला अक्षरशः हाताला धरून आधार देऊन अॅम्ब्युलन्समध्ये बसवून ग्रामीण रुग्णालयात नेले.
तिथे त्याची डॉ. दीपाली पाटील यांनी अॅटीजेन टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याला मानसिक आधार देत काही खायला आणि प्यायला दिले. तसेच प्राथमिक आरोग्य तपासणी करून या भिकार्यास शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर डॉ. अभिजीत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सरोज माने आणि विशाल वाघेला यांचे पथक उपचार करत आहेत.
दरम्यान, याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. विशाल नलवडे म्हणाले की, सध्या तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. तात्काळ कोरोना संसर्गावरची औषधे देण्यास सुरुवात करण्यात आली आहेत. गरज पडली तर आम्ही एचआरसिटी स्कॅन आणि पुढचे सर्व उपचार करणार आहोत. विटा शहरातच नव्हे तर अन्य कुठेही निराधार बेघर भिकारी जर संशयित कोरोना रुग्ण म्हणून आढळले, तर त्वरित प्रशासनाला कळवावे. म्हणजे ही महामारी कमी होण्यास मदत होईल. या कामी आम्हाला लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. विशाल नलवडे यांनी केले आहे.
COMMENTS