मुंबई, दि. 28 :- वांद्रे (पश्चिम) येथील पाली हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वांद्रे क

मुंबई, दि. 28 :- वांद्रे (पश्चिम) येथील पाली हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वांद्रे किल्ल्याजवळील हॉटेल ताज लँड येथे स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू (वर्सोवा वांद्रे सागरी सेतू) प्रकल्पाचा अतिरिक्त जोडरस्ता तयार करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तत्वतः मान्यता दिली.
वांद्रे (पश्चिम) विधानसभा क्षेत्रातील विविध सार्वजनिक कामासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीत हे निर्देश दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह नगरविकास, वित्त, गृहनिर्माण, बृहन्मुंबई महापालिका, एमएमआरडीए, म्हाडा, बेस्ट, भारत नेट, आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सी-लिंकपासून वांद्रे (पश्चिम) येथे जाताना मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे वांद्रे किल्ल्याजवळ सी-लिंकचे अतिरिक्त जोडरस्ता दिल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. एमएमआरडीएने यासंबंधी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.
वांद्रे स्टेशनच्या पश्चिमेकडील महाराष्ट्र नगर व शास्त्रीनगर झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनाचे काम सुरू आहे. या ठिकाणी प्रस्तावित विकास नियोजन रस्त्याचे काम करणे आवश्यक असून या रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी वांद्रे बेस्ट बस डेपोची रस्त्याच्या कामासाठी लागणारी जागा हस्तांतरित करण्यासंदर्भात मार्ग काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच सांताक्रूझ (पश्चिम) येथील दौलतनगर येथे जुनी बेस्टची वसाहत आहे. या वसाहतीच्या पुनर्विकास करण्याच्या प्रस्तावाबाबतही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.
म्हाडाच्या संक्रमण शिबिरांचा पुनर्विकासासंदर्भातही यावेळी सकारात्मक मार्ग काढण्याबाबत चर्चा झाली. वांद्रे पश्चिमेतील म्हाडाच्या प्लॉट नं. 7 व 8 वर शास्त्रीगर, कुरेशी नगर झोपडपट्टी वसलेली आहे. हा भूखंड संरक्षित करण्यासाठी म्हाडाने पुनर्विकास प्रक्रिया राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
एल्फिस्टन पुलाच्या पाडकामामुळे बाधित होणाऱ्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी विशेष प्रयोजन (स्पेशल पर्पज व्हेईकल) तयार करण्यात यावे. तसेच येथील दोन इमारती पूर्णपणे बाधित होणार असून या इमारतींमधील रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलविण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले. दोन इमारतींमधील रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलविल्यानंतर तेथे पाडकाम सुरू करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
COMMENTS