मुंबई, दि. 28 : बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) विविध आदेश, ना हरकत प्रमाणपत्रे आदी सुमारे 2 कोटी 32 लाख कागदपत्रे स्कॅनिंग कर

मुंबई, दि. 28 : बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) विविध आदेश, ना हरकत प्रमाणपत्रे आदी सुमारे 2 कोटी 32 लाख कागदपत्रे स्कॅनिंग करून डिजिटल स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. यासंबंधी माहिती देणाऱ्या माहिती पत्रिकेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्राधिकरणाची विविध कागदपत्रे एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याने ‘एसआरए’ने केलेल्या या कामाबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एसआरएचे अभिनंदन केले आहे.
सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने त्यांच्याकडील भूसंपादन आदेश, परिपत्रक 144 व 144 ए ना हरकत प्रमाणपत्र, वारसा आदेश, कलम 33 (निष्कासन) आदेश, कलम 33 अ आदेश, कलम 33/38 (निष्कासन) आदेश, परिशिष्ट – 2 पीएपी वाटप, ओसी/सीसी, परिपत्रक 162 अ प्रमाणे पुनर्वसन सदनिका वाटप पत्र आदी कागदपत्रे स्कॅन केली आहेत. ही स्कॅन केलेली कागदपत्रे https://sra.gov.in/ या संकेतस्थळावर नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
प्राधिकरणाकडील कागदपत्रे डिजिटल स्वरुपात ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे माहिती सुलभपणे मिळणार आहे. शिवाय प्राधिकरणात येणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी होणार आहे. नागरिकांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार असल्याचे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी सांगितले.
सदनिका हस्तांतरण व थकित भाड्याच्या ऑनलाईन सेवेच्या माहिती पत्रिकेचे अनावरण
बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) थकित भाडे व सदनिका हस्तांतरण सेवा ऑनलाईन केल्या आहेत. या ऑनलाईन सेवेची माहिती देणाऱ्या पत्रिकेचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झाले.
एसआरएमध्ये विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी व नागरिकांना एका क्लिकवर माहिती मिळावी, यासाठी प्राधिकरणाने थकित भाडे व सदनिका हस्तांतरण या सेवा https://sra.gov.in/ या संकेतस्थळावर नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना आपल्या तक्रारी प्राधिकरणाच्या ई-मेलवरही करता येणार आहे. ही माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी माहिती पत्रिका तयार करण्यात आली असून त्याचे वाटप प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व गृहनिर्माण संस्थांच्या सूचना बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
यावेळी प्राधिकरणाचे सचिव संदीप देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामा मिटकर, वित्त नियंत्रक श्री. अवताडे, सहायक निबंधक संध्या बावनकुळे, उपजिल्हाधिकारी श्री. तिडके, उपजिल्हाधिकारी वैशाली लंबाते, श्रीमती घेवराईकर, श्री. दावभट, तहसीलदार प्रशांती माने, कार्यकारी अभियंता राजाराम पाटील, आदी यावेळी उपस्थित होते.
००००
COMMENTS