फ्रँटलाईन आमदार

Homeसंपादकीय

फ्रँटलाईन आमदार

साधं राहण्याचं नाटक करता येत नाही. एकदा ते वठविता आलं, तर ती सातत्यानं यशस्वी करता येत नाही. साधेपणा आणि समाजसेवा अंगात असावी लागते. इव्हेंट करण्यासाठीही त्यात इव्हेंट असावा लागतो.

कोविड, लिंबू आणि भांडवलदार !
कोणता झेंडा घेऊ हाती ?
सोशल, सोसेल का?

साधं राहण्याचं नाटक करता येत नाही. एकदा ते वठविता आलं, तर ती सातत्यानं यशस्वी करता येत नाही. साधेपणा आणि समाजसेवा अंगात असावी लागते. इव्हेंट करण्यासाठीही त्यात इव्हेंट असावा लागतो. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांना सध्या जेवढी प्रसिद्धी समाजमाध्यमांत आणि माध्यमांत मिळतं आहे, तेवढी प्रसिद्धी पैसा खर्च करूनही कुणालाही मिळणार नाही. 

पारनेरमध्ये कुणालाही तीनदा विजय मिळविता आला नव्हता, तो विजय औटी यांनी मिळविला होता. त्यांचा पराभव करून नीलेश लंके निवडून आले, तो अपघात नव्हता, हे नंतर सिद्ध झालं. गेल्या दीड वर्षात नीलेश लंके यांनी जे काम उभं केलं, ते प्रस्थापितांनाही उभं करता आलं नाही. साखर कारखाने, सहकारी संस्था ज्यांच्या ताब्यात आहे, त्यांनाही जे जमलं नाही, ते आ. लंके यांनी करून दाखविलं. निवडून आल्यानंतर आमदारांना मुंबईत निवासस्थान मिळतं. नीलेश लंके यांनाही मिळालं. त्यांच्या निवासस्थानाचे दरवाजे सतत इतरांसाठीच उघडे. कधी कधी आमदार नीलेश लंके उशिरा आमदार निवासात पोहचायचे, तर तिथं अगोदरच त्यांच्या जागेवर अन्य कुणीतरी झोपलेलं असायचं. एखाद दुसरा आमदार असता तर त्याचं पित्त खवळलं असतं. नीलेश सामान्यातून असामान्य झाले असले, तरी त्यांचे पाय अजूनही जमिनीवर असल्याची प्रचिती एकदा नव्हे, तर अनेकदा आली. देशात पहिल्यांदा टाळेबंदी लागू झाली, तेव्हा स्थलांतरित रस्त्यानं जाताना त्यांना अनेकांनी पाहिलं. त्यांचं दुःख पाहून अनेकांनी मदत केली; परंतु काळजाला पाझर फुटून संबंधितांच्या भोजनाची व्यवस्था करण्यापासून त्यांना त्यांच्या गावी पोचविण्यापर्यंतची व्यवस्था नीलेश लंके यांनी केली. कोरोनाबाधितांचं प्रमाण जसं वाढायला लागलं आणि त्यांच्या लुटीच्या बातम्या जशा प्रसिद्ध व्हायला लागल्या, तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी करावं असा विचार अनेकांच्या मनात आला असेल; परंतु विचार करून त्यावर थांबणार्‍यांपैकी नीलेश लंके नव्हेत. त्यांनी शरद पवार यांच्या नावावर कोविड सेंटर सुरू केलं. पुण्या-मुंबईतील जम्बो सेंटरच्या तोडीचं किंबहुना त्याहून अधिक सुविधा असलेलं सेंटर त्यांनी कर्जुलेहर्यात सुरू केलं. त्याची दखल खुद्द विभागीय आयुक्तांना घ्यावी वाटली. नगर जिल्ह्याबरोबरच पुणे जिल्ह्यातील लोकही इथं उपचाराला येत असत. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतरही नीलेश यांनी तातडीनं भाळवणीत 1100 बेडस्चं कोविड सेंटर सुरू केलं. अन्य कोविड सेंटरमध्ये पैसे घेतले जात असताना नीलेश यांनी सुरू केलेल्या शरद पवार आरोग्य मंदिरात उपचार मोफत मिळतात. ज्यांच्या आईवडीलांना कोरोना झाला, त्यांच्या मुलांचे मामा होऊन त्यांची जबाबदारीही नीलेश लंके जेव्हा स्वीकारतात, तेव्हा त्यांचं वेगळेपण उठून दिसतं. कोरोनाबाधितांचा मोफत नाष्टा, जेवण, त्यांच्यासाठी योगोपचार अशा सुविधा त्यांनी पुरविल्या. नाष्ट्यात अंडी, दूध, सुकामेव्याचा समावेश आहे. शिवाय रुग्णांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. त्यांच्या कोविड सेंटरचं व्यवस्थापन नीलेश लंके प्रतिष्ठान पाहतं. विशेष म्हणजे कोविड सेंटरच्या व्यवस्थापनाचा खर्च कमी होतो. त्याचं कारण लंके यांचे सेवाभावी कार्यकर्ते त्यात झोकून देऊन काम करतात. वेगवेगळ्या गावचे सरपंच, कार्यकर्ते रुग्णांना हवं नको ते पाहतात. आ. लंके स्वतः कोरोनाबाधितांत मिसळून सेवा करतात. त्यामुळं तर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना फोन करून काळजी घेण्याचा सल्ला देतात. शरद पवार, सुप्रिया सुळे त्यांच्या कामाचं कौतुक करतात. काही मदत लागली, तर सांग असं हक्कानं बजावतात. आ. लंके यांची रुग्णसेवा पाहून, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना एक रुग्णवाहिका दिली.

शरद पवार आरोग्य मंदिराचं व्यवस्थापन आणि आ. लंके यांचं काम पाहून आदर्श गाव योजना संकल्प व प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांना लंके यांच्यात आर. आर. पाटील दिसतात. यापेक्षा दुसरा कोणता गौरव असू शकेल? गेल्या वर्षापासून आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. त्यांचा दुवा आ.लंके यांना नक्कीच मिळत असेल. आ. लंके एवढा खर्च कुठून करतात, असा प्रश्‍न पडणं स्वाभावीक आहे. नीलेश लंके यांच्या प्रतिष्ठानचं काम पाहून लोक मदतीला आले आहेत. पुण्यात एका दिव्यांगानं थेट अजित पवार यांना भेटून लंके यांच्या प्रतिष्ठानला मदत कशी करायची, चेक कुणाच्या नावानं द्यायचा, अशी विचारणा केली. एक दिव्यांग जेव्हा कोरोनाविरोधातील लढ्यात आपलं योगदान द्यायला पुढं येतो, तेव्हा त्याची बातमी वाचून मदतीचा ओघ सुरू झाला. थेट देश-विदेशातून मदत यायला लागली. एका कवीनं म्हटल्याप्रमाणं देणार्‍यानं देत जावं, देता देता देणार्‍याचा हात घ्यावा, असं म्हटलं. त्याचा अर्थ त्याचा हात तोडून घेणं नव्हे, तर त्याच्या हातच्या दातृत्वाचा गुण घ्यावा, असा होतो. नीलेश यांच्या मदतीचा आणि दातृत्वाचा आदर्श आता इतर लोक घेत असून देणार्‍याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी अशी अवस्था आता नीलेश लंके यांची झाली आहे. 

COMMENTS