नाशिक :राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनासाठी आणलेल्या सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून शे
नाशिक :राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनासाठी आणलेल्या सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवस वीज पुरवठा मिळत असून, ही जगातील सर्वात मोठी विकेंद्रीत सौर निर्मिती योजना असून आगामी काळात यामुळे राज्यासह जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शिरूर तांगडी येथील ६ मेगावॅटच्या सौर प्रकल्पास नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यासह नाशिक जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून शिरूर तांगडी येथील ६ मेगावॅटच्या या प्रकल्पातून सद्यस्थितीत ५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती होत आहे. या प्रकल्पामुळे या भागातील २ हजार ४६० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे.
चांदवड तालुक्यातील शिरूर तांगडी येथील सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेवर हा सौर प्रकल्प उभारण्यात आला असून विजेची निर्मिती सुरू झाली आहे. ग्रामपंचायत, ग्रामस्थ व सरपंच यांचा पुढाकार पाहून जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले तसेच इतर ग्रामपंचायती व सरपंचांनी याचा आदर्श घेऊन सौर प्रकल्प निर्मितीस जागा देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होण्यासोबत स्वस्तात वीज उपलब्ध झाल्याने उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करण्याची संधी भविष्यात मिळणार आहे. या योजनेमुळे कृषी क्षेत्राला मोलाची मदत करण्यासोबतच उद्योगांनाही प्रोत्साहन मिळणार असल्याचे प्रतिपादन अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी यावेळी केले.याप्रसंगी महावितरणच्या नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, प्रांताधिकारी जितेंद्र कडलग, तहसीलदार मंदार कुलकर्णी, चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश चालीकवार टोरन्ट पॉवरचे प्रतिनिधी, शिरूर तांगडीच्या सरपंच पूनम अमोल जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS