पुणे/बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यात अनेक घडामोडी घडत असून, याप्रकरणात वाल्मिक कराडवर मकोक
पुणे/बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यात अनेक घडामोडी घडत असून, याप्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे कराडची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कराड यांनी रिअल इस्टेटमध्ये कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक केली आहे, त्यामुळे कराडसह त्यांच्या भागाीदारांचे धाबे दणाणले आहेत.
डिसेंबर महिन्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेले आहे. त्यावेळी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केलेला नव्हता, मात्र आता हा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याची संपूर्ण संपत्ती तपास अधिकार्यांच्या रडारवर आली आहे. त्यामुळे कराडच्या शेकडो कोटींच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांचे अनेक ठिकाणी संयुक्त भूखंड असल्याचा दावा भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी केला आहे, यामुळे आता हे या संपत्तीवर जप्तीची टागती तलवार आहे. वाल्मीक कराडवरील कारवाईने धनंजय मुंडेंच्या अडचणीत यामुळे वाढ होऊ शकते. वाल्मीक कराडने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर एका इमारतीत ऑफिससाठी जागा घेतल्याचे समोर आले आहे. ही गुंतवणूक वाल्मीकने एका महिलेच्या नावावर केल्याचे उघड झाले आहे. फर्ग्युसन कॉलेज रोडवर कुशल वॉल स्ट्रीट या इयमरातीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी काम सुरू होतानाच वाल्मीक कराडने इथे गुंतवणूक केली. या इमारतीत ऑफिस नंबर 610 सी हे अपार्टमेंट असून त्यात 45.71 चौ.मी कार्पेट एरिया एवढ्या जागेचे आलिशान ऑफिस घेतले आहे. विशेष म्हणजे या ऑफिसला बाल्कनी असून पार्किंगसाठी देखील जागा देण्यात आली आहे. वाल्मीकचे दुसरे ऑफिस नंबर 611 बी या अपार्टमेंटमध्ये असून त्याचे कार्पेट एरिया 54.51 चौ.मी एवढे आहे. यात देखील पार्किंगची सुविधा आहे. हा एकूण 25 कोटींचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरीच्या हायफाय फ्लॅटचा होणार लिलाव
पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडच्या या अलिशान फ्लॅटचा मिळकत कर थकवल्याप्रकरणी लवकरच लिलाव होणार असल्याची माहिती आहे.पिंपरी चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील वाल्मिक कराडचा फ्लॅट सील केला जाणार आहे, मग त्याचा लिलाव ही केला जाईल. 16 जून 2021ला वाल्मिक कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे या फ्लॅटची नोंदणी झालेली आहे. मात्र तेव्हापासून वाल्मिक कराडने मिळकत कर थकवला आहे. 1 लाख 55 हजार 444 रुपयांचा हा मिळकत कर थकवला आहे.
मंत्री मुंडे आणि कराडांची एकत्र जमीन : दमानिया
विशेष म्हणजे वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांची अनेक ठिकाणी एकत्र जमीन असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. त्यानंतर अंजली दमानिया यांनी या प्रकरणात उडी घेत या दोघांच्या जमिनीचा सामायिक सातबाराच एक्सवर ट्विट करत पोस्ट केला. त्यात जवळपास 88 एकर जमीन मुंडे-कराड यांच्या नावावर असल्याचे दिसते. त्यामुळे या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनाही मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
COMMENTS