Homeताज्या बातम्यासंपादकीय

आपणही अपेक्षा करूया !

आपण द्वेष आणि भीतीच्या अडथळ्यांवर मात करूया आणि पुन्हा एकदा प्रयत्न करूया, स्वतःला आणि आपल्या मुलांना, आनंद देण्याचा आणि प्रेमाच्या वाटणीतून जगण्

सरकारी नोकऱ्या अन् खाजगी भरती !
सुदृढ लोकशाहीसाठी निष्पक्ष आयोग !
महिलांचा एल्गार ! 

आपण द्वेष आणि भीतीच्या अडथळ्यांवर मात करूया आणि पुन्हा एकदा प्रयत्न करूया, स्वतःला आणि आपल्या मुलांना, आनंद देण्याचा आणि प्रेमाच्या वाटणीतून जगण्याची चव चाखूया. मी प्रार्थना करतो की, भूतकाळातील चुका आपल्याला अनुभवाच्या शहाणपणाने मार्गदर्शन करतील. हे शब्द आहेत नव वर्षाच्या मुहूर्तावर गेल्या वीस महिन्यांपासून हिंसेच्या आगीत होरपळणाऱ्या मणिपूर चे मुख्यमंत्री विरेन सिंह यांचे. सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखले जाणाऱ्या सात आदिवासी राज्यांपैकी एक असलेले मणिपूर खनिज संपत्तीने संपन्न आहे. एरव्ही, शांतता आणि पहाडी आदिवासी सभ्यता म्हणून ओळखले जाणारे हे राज्य दोन समुहातील हिंसाचाराने अक्षरशः होरपळले आहे. स्वतः मुख्यमंत्री विरेन सिंह म्हणतात की, नवीन वर्षाच्या निमित्ताने मी मणिपूरच्या सर्व जनतेला माझ्या शुभेच्छा देतो. 2025 चे स्वागत करत असताना, आपण आपल्या राज्यासाठी शांतता, सौहार्द आणि प्रगतीसाठी आपली वचनबध्दता राखूया!” मुख्यमंत्री यांचे हे शब्द म्हणजे होरपळत असलेल्या मणिपूर हिंसाचाराची कबूली आहे. ‘देर आए दुरूस्त आए’, अशा आशयाची एक म्हण हिंदी भाषेत आहे, त्या म्हणीचा सार्थ परिचय मणिपूर चे मुख्यमंत्री विरेन सिंह यांच्या वक्तव्यातून येतो. कदाचित, हे त्यांच्या पश्चातापातून बाहेर आलेले शब्द असतील. परंतु, मणिपूर पूर्वपदावर आणण्याचे त्यांनी केलेले सुतोवाच महत्वपूर्ण आहे. माध्यमांना संबोधित करताना, मुख्यमंत्री म्हणाले की, वर्षाची समाप्ती आशादायी असताना, त्यांना आशा आहे की नवीन वर्ष २०२५ मध्ये राज्यात शांतता आणि सामान्य परिस्थिती परत येईल. “हे खूप दुर्दैवी आहे की अनेकांनी आपले प्रियजन गमावले आहेत, अनेकांना आपली घरे आणि गावे सोडावी लागली आहेत. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांतील सकारात्मक घडामोडी लक्षात घेता मला आशा आहे की नवीन वर्ष २०२५ मध्ये राज्यात शांतता आणि सामान्य परिस्थिती परत येईल,” अशा शब्दांत मुख्यमंत्री सिंह यांनी नव्या परिस्थितीविषयी आशा व्यक्त केली. मणिपूर मध्ये एकंदरीत ३५ कम्युनिटींचे वास्तव्य आहे. परंतु, त्यातील कुकी आणि मैतेई या दोन समुहामध्ये आपसातील हिंसाचार वीस महिने सुरू आहे. आता, उशीरा का असेना परंतु, मुख्यमंत्री त्याविषयी अधिक जबाबदारीने आणि भावुकतेने व्यक्त होत आहेत, ही बाब आशादायी आहे. संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीमत्वांनी आपल्याच प्रजेविषयी अधिक जबाबदारीने वर्तन करावे, ही अपेक्षा असते. संविधानिक सत्तापदावर असणाऱ्या व्यक्तीवर ही जबाबदारी अधिक मोठी असते! कारण, त्यांच्या सुरक्षेसह सर्वच यंत्रणा ताब्यात असतात. वर्षानुवर्षे एकमेकांच्या सहवासात एकमयतेने वास्तव्य करणारे दोन समुह एकाएकी एकमेकांचे जीव घेण्यास कसे तयार झाले, हा एक संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय बनला. दोन समुहांच्या मनात पेरला गेलेला विखार, सहजासहजी शमत नसतो. त्यासाठी, विशेष मोहीम हाती घ्यावी लागते. वैराने वैर नमत नाही. त्यासाठी, प्रेम-करूणा याची पेरणी करावी लागते. त्या मूल्यांवर विश्वास ठेवावा लागतो आणि लोकांमध्ये निर्माण करावा लागतो. “२०२४ हे वर्ष राज्यासाठी कठीण वर्ष ठरले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अद्यापही मनाला दिलासा देणारी नसल्यामुळे, हजारो लोक मदत शिबिरांमध्ये आणि मित्रांच्या घरी आश्रय घेत आहेत; माझा पहिला आणि मुख्य विचार त्यांच्याकडे जातो. आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत का? त्यांना सामान्य होण्याची आशा देण्यात आणि त्यांनी एकदा घरी परत पाठवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत का?” हे शब्द आहेत, मुख्यमंत्री विरेन सिंह यांचे. त्यांच्या शब्दात त्यांच्या समोर असलेल्या आवाहनाचे आणि जबाबदारी चे भान त्यांना आले आहे, हे स्पष्ट दिसते. आपणही अपेक्षा करूया की, मणिपूर सामान्य स्थितीत येईल!

COMMENTS