बंगळुरू : कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि माजी परराष्ट्रमंत्री राहिलेले एस. एम. कृष्णा यांचे मंगळवारी निधन झाले. मृत
बंगळुरू : कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि माजी परराष्ट्रमंत्री राहिलेले एस. एम. कृष्णा यांचे मंगळवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मालविका आणि शांभवी या दोन मुली आहेत. कृष्णा यांच्या निधनाबद्दल राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दु:ख व्यक्त केले आहे.
एस.एम. कृष्णा हे मूळचे काँग्रेस विचारधारेचे होते. तब्बल 45 वर्षांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये काम केलेल्या कृष्णा यांनी 2017 साली पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले होते. मात्र, वयोमानामुळे सक्रिय राजकारणात नव्हते. 1 मे 1932 रोजी जन्मलेले कृष्णा उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमधून पदवी घेतली. बेंगळुरूच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली आणि नंतर अमेरिकेतील डलास येथील सदर्न मेथोडिस्ट युनिव्हर्सिटी आणि नंतर जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात शिक्षण घेतले होते. त्यानंतर भारतात त्यांनी बेंगळुरूच्या रेणुकाचार्य विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक म्हणून काम केले. कालांतराने ते राजकारणात सक्रिय झाले. कृष्णा 1962 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. येथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. ऑक्टोबर 1999 ते मे 2004 या कालावधीत कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर एस. एम. कृष्णा यांनी डिसेंबर 2004 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला. कृष्णा यांनी आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील 2009-2012 च्या यूपीए सरकारमध्ये काही काळ परराष्ट्रमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.
COMMENTS