Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरी देवी विवाह सोहळा थाटात

म्हसवड / वार्ताहर : येथील ग्रामदैवत व लाखो भक्तांचे कुलदैवत श्री सिध्दनाथ आणि माता जोगेश्‍वरी देवीचा भव्य विवाह सोहळा पुरोहितांच्या मंत्रोच्चार

गोंदवले येथील फर्निचरच्या शोरुमला भीषण आग; लाखोचे नुकसान; चारजण जखमी
टाटा कमिन्स कंपनीचे दीड कोटीचे इंधन इंजेक्टरची चोरी
घंटागाडीचे 6 कोटींचे टेंडर कुणाला?

म्हसवड / वार्ताहर : येथील ग्रामदैवत व लाखो भक्तांचे कुलदैवत श्री सिध्दनाथ आणि माता जोगेश्‍वरी देवीचा भव्य विवाह सोहळा पुरोहितांच्या मंत्रोच्चार, मंगलाष्टक आणि शाही वाद्यांच्या गजरात पार पडला. या उत्सवी सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
कार्तिक शुध्द प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर श्री म्हातारदेवाच्या मूर्तीसमोर सालकरी यांच्या हस्ते घटस्थापनेने विवाह सोहळ्याचा प्रारंभ झाला. त्यानंतर सकाळी 11 वाजता मुख्य मंदिरासमोरील हत्ती मंडपात देवी जोगेश्‍वरी व श्री सिध्दनाथाच्या उत्सव मूर्तींना हळदी लावण्याचा कार्यक्रम झाला. या सोहळ्यात भाऊबीज, दिवाळी मैदान यांसारखे धार्मिक कार्यक्रमही पार पडले.
विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरासमोरील मंडपातील अखंड पाषाणातील हत्तीच्या मूर्तीवर सजविलेल्या अंबारीत श्री सिध्दनाथाची उत्सव मूर्ती सायंकाळी स्थानापन्न करण्यात आली. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. परिसरातील शेतकर्‍यांनी या सोहळ्यासाठी उसाच्या मोळ्या अर्पण केल्या होत्या.
मंदिर आवारातील दीपमाळ सायंकाळी उजळवण्यात आली. मंदिराच्या शिखरावर फुलांच्या आणि विद्युत दिव्यांच्या माळांनी सजावट करण्यात आली होती. ज्यामुळे मंदिर परिसर अत्यंत भव्य दिसत होता. गावोगावच्या गजी मंडळांनी गजीनृत्य सादर केले, आणि दिवटी धारकांनी हत्तीसमोर रांग धरली होती.
रात्री साडेअकरा वाजता सालकर्‍यांनी अंबारीतील मूर्ती मुख्य गाभार्‍यात आणण्यात आली. मध्यरात्री बारा वाजता पुरोहितांनी मंगलाष्टकांच्या मधुर सुरात विवाह विधी पुर्ण केला. विवाह सोहोळ्यास मानाचा पोशाख घेऊन आलेले मानकरी ओंकार राजेंद्र माने, गणेश माने, सालकरी महेश गुरव व त्यांच्या पत्नी, कुरवली शालन सांगावे येथील रथाचे मानकरी तेजसिंह राजेमाने, दिपसिंह राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजीराजे राजेमाने, विश्‍वजीत राजेमाने, गणपतराव राजेमाने, मंदीराचे विश्‍वस्त, मानकरी गुरव मंडळी, श्री सिध्दनाथ मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, सेवेकरी व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. मानकरी आणि सेवेकरी तसेच अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. सोहळ्यादरम्यान पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
विवाह सोहळ्याची सांगता मार्गशीर्ष प्रतिपदेला वधू-वरांच्या वरात अर्थात रथोत्सवाने होणार आहे. सोमवार, दि. 2 डिसेंबर रोजी म्हसवड येथील रिंगावण पेठ मैदानावर लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथयात्रा पार पडेल, असे मंदिर ट्रस्टने सांगितले.

COMMENTS