Homeताज्या बातम्यासंपादकीय

भाजपला बंडखोरीचे वारे !

लोकसभा निवडणुकीत भाजपने आपले उमेदवार ऐनवेळी जाहीर केले होते. परिणामी भाजपच्या उमेदवारांना निवडणुकीची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता. म

लाचखोरीपासून संरक्षण नाहीच
लग्नाळूंचा मोर्चा आणि वास्तव
पहाटेच्या शपथविधीचे अर्धसत्य

लोकसभा निवडणुकीत भाजपने आपले उमेदवार ऐनवेळी जाहीर केले होते. परिणामी भाजपच्या उमेदवारांना निवडणुकीची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वात आधी आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर करत त्यांना निवडणुकीची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे. मात्र यामुळे भाजपमध्ये बंडखोरीचे वारे वाहतांना दिसून येत आहे. कारण यावेळेस भाजपमधून विधानसभा लढवण्यासाठी अनेक जण इच्छूक होते. मात्र भाजपने काही ठिकाणी समतोल साधत जुन्याच चेहर्‍यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर दुसरीकडे विद्यमान आमदारांना संधी देण्याऐवजी त्यांच्याच घरात उमेदवारी दिली आहे. मात्र यामुळे भाजपमध्ये निष्ठावंत नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणांवरून बंडखोरीचे वारे चांगलेच वाहतांना दिसून येत आहे. ही बंडखोरी थोपविण्याचे भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान दिसून येत आहे. त्यातच महायुतीमध्ये तीन पक्ष असल्यामुळे बहुतांश जागा या शिंदे अणि अजित पवार गटाला सोडाव्या लागणार आहे. तरीदेखील भाजप 150 जागा लढण्याची शक्यता आहे. असे असतांना भाजपच्या अनेक नेत्यांनी अजित पवार गटातील उमेदवारांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी बंडखोरी खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे. मात्र अभी नही तो कभी नही, या पावित्र्याने अनेक उमेदवार अपक्ष लढण्यास इच्छूक असल्याचे दिसून येत आहे. सर्वात प्रथम बंडखोरी पुण्यातील कोथरूड मतदारसंघात होतांना दिसून येत आहे. कारण या मतदारसंघातून दुसर्‍यांदा चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीला भाजपमधील पदाधिकार्‍यांकडून विरोध होतांना दिसून येत आहे. भाजपचे स्थानिक नेते अमोल बालवडकर बंडखोरी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रकांत पाटील हे मुळचे कोल्हापूरचे आहेत. त्यांना पोटनिवडणुकीपासून उमेदवारी देण्यात येत आहे. त्यामुळे कोथरुडकरांवार बाहेरचा उमेदवार लादला जात असून आम्हाला संधी मिळत नाही, अशी नाराजी स्थानिक नेत्यांमध्ये आहे. यंदाच्या विधानसभेला आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी अमाल बालवडकर यांनी पक्षाकडे केली होती. तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात देखील राहुरी मतदारसंघात शिवार्जी कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून माजी आमदार चंद्रकांत कदम यांच्या मुलाने बंडाचे निशाण फडकावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपलाच बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. श्रीगोंदा मतदारसंघात विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुतेंना उमेदवारी दिल्याने इच्छूक असलेल्या सुवर्णा पाचपुते या नाराज झाल्याचे दिसत आहे. त्यांनी अपक्ष लढण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे अजूनही महायुतीतील घटक पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गटाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. मात्र आज मंगळवारी निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार आहे, त्यामुळे शिंदे आणि अजित पवार गट काही तासांतच आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करू शकतो. मात्र त्यांना उमेदवारांची यादी जाहीर करताच शिंदे गट आणि अजित पवार गटाला देखील बंडखोरीचे ग्रहण लागू शकते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात असले तरी, शिवसेना आणि काँगे्रसमध्ये अजूनही 25-30 जागांवरून घोडे अडले आहे. विदर्भात ठाकरे गटाची ताकद नसतांना देखील ठाकरे गट विदर्भात आपली ताकद वाढवू पाहत आहे, त्यासाठीच ठाकरे गटाला विदर्भात जास्तीच्या जागा हव्या आहेत. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत काँगे्रसची विदर्भातील ताकद चांगलीच वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विदर्भात काँगे्रसला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँगे्रस आपल्या जागा सोडण्याच्या तयारीत नाही, त्यामुळे काँगे्रसमधील अनेक उमेदवार अपक्ष लढल्यास नवल वाटायला नको, त्याचा फटका ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे.

COMMENTS