Homeताज्या बातम्यासंपादकीय

महायुतीतील नाराजीनाट्य !

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असतांनाच महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत असले तरी, आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. आणि ती अस

हिजाब बंदीच्या निमित्ताने..
शेतकर्‍यांची कोंडी
नव्या राज्यपालांच्या नियुक्तीचा अन्वयार्थ

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असतांनाच महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत असले तरी, आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. आणि ती अस्वस्थता थोपवण्याचा प्रयत्न अंतर्गत होतांना दिसून येत आहे. महायुतीचे सरकार असूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, अडीच वर्ष आपली सत्ता असून आमदारांना मंत्रिपदे, इतर महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे ही नाराजी वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच महायुतीतील प्रमुख नेते म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये कुठेतरी सुसंवाद कमी पडत असल्योच देखील दिसून येत आहे. कारण विधानसभेसाठी सर्वाधिक जागा आपल्यालाच मिळाल्या पाहिजे असा तिन्ही पक्षाचा इच्छा दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिंदे आणि पवार यांना विधानसभेमध्ये आपले आमदार पुन्हा निवडून आणण्याचे मोठे आव्हान आहे. अशापरिस्थितीत नाराजीनाट्य थोपवण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर उभे आहे.

भाजपचे सर्वाधिक आमदार असतांना देखील त्यांच्याही वाट्याला काहीही हाती आलेले नाही. त्यामुळे ही नाराजी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच शिंदे गटातील आमदार आजजरी शिवसेनेसोबत असले तरी, त्यांच्याही वाट्याला काहीही हाती आलेले नाही. अनेक आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी खास कोट शिवून तयार होते. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटत आला तरी, त्यांना अजूनही तशी संधी मिळालेली नाही. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी नाट्य वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळेच यातून वाट काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाठ यांना सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची वणी लावली. तर दुसरीकडे भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. खरंतर महायुती सत्तेत असूनही आपल्या आमदारांना काहीही देवू शकली नाही. तर दुसरीकडे अर्थखाते राष्ट्रवादीच्या अजित पवारांकडे असल्यामुळे त्यांनी देखील शिंदे आणि भाजप आमदारांना निधी देतांना सापत्न वागणूक दिल्याचा याच आमदारांचा आरोप आहे. तर दुसरीकडे आपल्याकडेही शिंदे यांच्याइतकेच आमदार असतांना देखील आमच्या आमदारांची मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावत नसल्यामुळे अजित पवार नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या नाराजीनाट्याचा स्फोट होण्याची वेळ जवळ येत असल्याचे दिसून येत आहे. खरंतर केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे भाजपच्या आमदारांनी अजूनही बंड केलेले नाही, मात्र हे बंड जास्त काळ थोपवता येणार नाही.

शिवाय दुसरीकडे महायुतीसमोर मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मोठी कोंडी करतांना दिसून येत आहे. मनोज जरांगे यांनी थेट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न चालवला आहे, तर दुसरीकडे शेतकरी नेते राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू या नेत्यांनी तिसर्‍या आघाडीसाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे तिसरी आघाडी महायुतीला पूरक ठरते की घातक ठरते, ते निकालावरूनच कळणार यात शंका नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाची खिचडी झालेली आहे. त्यातच महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटपावरून चांगलीच जुंपतांना दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या नाराजीनाट्याचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अनेक जिल्ह्यात भाजपचे पदाधिकारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करणार नसल्याचा सरळ-सरळ पवित्रा घेतांना दिसून येत आहे. त्यामुळे हा संघर्ष पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. वैचारिक संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीचे निकाल उलटफेर करणारे ठरतील यावर आत्ताच भाष्य करणे योग्य नाही. मात्र यानिमित्ताने एवढेच सांगावेसे वाटते की, ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात बराच उलटफेर बघायला मिळू शकतात. 

COMMENTS