शाळा बंदच राहणार ; शालेय विभागाचा निर्णय रद्द

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळा बंदच राहणार ; शालेय विभागाचा निर्णय रद्द

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात शाळा सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शालेय विभागाने घेतला होता. त्यानुसार येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरू होणार होत्या. मात्

चोपडा येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकान फोडून तीन लाखाचे चांदीचे दागिने चोरीला 
सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांचे पुर्नवसन करा : डॉ.हुलगेश चलवादी
अपूर्वाने पुन्हा घेतला प्रसादशी पंगा थेट काढला कानाखाली आवाज!

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात शाळा सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शालेय विभागाने घेतला होता. त्यानुसार येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरू होणार होत्या. मात्र टास्क फोर्सच्या सदस्यांनी शालेय विभागाच्या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर ठाकरे सरकारने गुरूवारी नव्याने आदेश काढत शालेय विभागाचा शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द केला.
मुलांचे लसीकरण न झाल्याने सध्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास टास्क फोर्सने विरोध केल्याने शाळा बंदच राहणार आहेत. शालेय शिक्षण विभागाचा निर्णय ठाकरे सरकारने रद्द केला आहे. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करण्याच्या निर्णयावर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत काल उशिरा बैठक पार पडली. या बैठकीला टास्क फोर्सचे सदस्य, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि काही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत लहान मुलांच्या आरोग्य संदर्भात आणि शाळा सुरू करायच्या की नाही यावर चर्चा झाली. यावेळी शाळा 17 ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे. शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. 18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण झाले नसताना त्यांना शाळेत बोलवणं धोकादायक असल्याची भूमिका तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर टास्क फोर्सच्या बैठकीत शाळा रद्द करण्याचा निर्णय झाला. राज्यातील सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटस् रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी राज्य सरकारने बुधवारी दिली. मंगल कार्यालये, इनडोअर खेळांनाही परवानगी दिली आहे. तथापि, मंदिरे, प्रार्थनास्थळे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आदी तूर्त बंदच राहणार आहेत. येत्या 15 ऑगस्टपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने राज्यातील जनतेला कोरोना निर्बंधांतून जणू स्वातंत्र्य मिळाले आहे. राज्यातील जनतेला दिलासा देणारी ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. मात्र कोरोनाची तिसरी लाट डोक्यावर असून, त्यासाठी लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात लसीकरणाचा वेग खाली आला आहे. अशा परिस्थितीत जनतेची निर्बंधातून मुक्तता करण्यात आली असली, तरी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका कायम आहे.

सरकार आहे की सर्कस? भाजपची टीका
17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येतील, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तशी घोषणा केली होती. मात्र बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्स बैठकीत शिक्षण विभागाच्या या निर्णयाला विरोध केला. टास्क फोर्सने शिक्षण विभागाच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याने हा निर्णय रद्द करण्यात आला. यावरून भाजपने राज्य सरकारवर टीका केली असून, ‘सरकार’ आहे की ‘सर्कस’, अशी संभावना केली आहे. राज्यात शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयात गडबड झाल्याचे बोलले जात आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करताच हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्‍न असल्याने त्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असतानही हा निर्णय घाईने घेतल्याचीही चर्चा आहे.

COMMENTS