मुंबई ः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेली कलगीतुरा, तर दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्दयावरून ओबीसी-मराठा बांधव आमन
मुंबई ः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेली कलगीतुरा, तर दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्दयावरून ओबीसी-मराठा बांधव आमनेसामने येत असतांनाच खासदार शरद पवार यांनी आगामी काळात महाराष्ट्रात देखील मणिपुरसारखे काहीतरी घडेल अशी शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात दंगली घडू शकतात, मणिपुरसारखी अराजकता राज्यात निर्माण होवू शकते, असा इशाराच शरद पवार यांनी दिल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने नवी मुंबईमधील वाशी येथे सामाजिक ऐक्य परिषद भरवली होती. या परिषदेला शरद पवार यांनी संबोधित केले.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात देशाला देशा दाखवणारे अनेक युगपुरुष जन्माला आले. त्यामुळे महाराष्ट्र अजून तरी स्थिर आहे. परंतु, आपल्याला देशातील परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जात पंथ, धर्म, भाषा या गोष्टी बाजूला सारून सर्वांनी एकसंघ समाज व एकसंघ राष्ट्र ही संकल्पना घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी ही ऐक्य परिषद मोलाची कामगिरी बजावेल, असे मला वाटते, असे शरद पवार म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले, मणिपूरमध्ये जे काही घडले त्यानंतर ते राज्य अस्थिर झाले आहे. परंतु आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एकदाही तिकडे जावे असे वाटले नाही. मोदींना मणिपूरमधील नागरिकांना दिलासा द्यावासा वाटला नाही. मणिपूरमध्ये घडले तेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये कर्नाटकातही घडले, त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही असे काहीतरी घडेल अशी चिंता आता वाटू लागली आहे. सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊन गेले आहेत. त्यांच्या विचारांमुळे आपले राज्य वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रगती करत राहिले आहे, असेही पवार म्हणाले.
शरद पवारांकडून दंगली घडविण्याची भाषा ः बावनकुळे – खा. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिखट हल्ला चढवत निवडणुकीच्या तोंडावर दंगली घडवण्याची भाषा शरद पवारांनाकडून केली जात आहे. हे योग्य नाही. मात्र जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातील जनता दंगलीपर्यंत जाईल अशी परिस्थिती कधी नव्हती आणि होणारही नाही. पण काही लोक समाजात तेढ निर्माण करून अशी काही आंदोलने निर्माण करत आहेत. समाजाला विचलित ठेवण्याचे काम काही लोक करत आहेत, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.
मणिूपर होण्यासाठी पवारांनी हातभार लावू नये :राज ठाकरे – राज्याचा मणिपूर होण्यासाठी शरद पवारांनी हातभार लावू नये, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. शरद पवार यांचे स्टेटमेंट मी ऐकले नाही, पण पवार साहेबांनी याला हातभार लावू नये, अशी टीका राज यांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथे पूर परिस्थिती पाहणी करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
COMMENTS