शेवगाव तालुका ः आबासाहेबांनी लावलेल्या शिक्षणरूपी रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आपल्या एफ.डी.एल.या शिक्षण संस्थेतून विद्यार्थ्य
शेवगाव तालुका ः आबासाहेबांनी लावलेल्या शिक्षणरूपी रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आपल्या एफ.डी.एल.या शिक्षण संस्थेतून विद्यार्थ्यांना आज विविध शाखेचे अद्यावत शिक्षण मिळत आहे. अॅड. विद्याधरजी काकडे साहेब व हर्षदाताई काकडे आबासाहेबांचा वारसा मोठ्या नेटाने पुढे चालवत आहेत असे प्रतिपादन शेवगाव येथील ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. संजय सानप यांनी केले.
कर्मयोगी आबासाहेब काकडे यांचा 105 वा जयंती सोहळा आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी अॅड. संजय सानप, प्रमुख अतिथी म्हणून सचिन भाकरे (विस्ताराधिकारी, पंचायत समिती शेवगाव) उपशिक्षणाधिकारी धनंजय घुले, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. लक्ष्मण बिटाळ, शिक्षण विभागप्रमुख प्रा. वंदना पुजारी, सहप्रमुख प्रा. अशोक आहेर, विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते, उपप्राचार्य श्रीमती रूपा खेडकर, उपमुख्याध्यापिका श्रीमती पुष्पलता गरुड, पर्यवेक्षक सुनील आव्हाड, हरिश्चंद्र मडके, शिवाजी पोटभरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्रथम वार्षिक अंक ’विद्याधन’ याचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अॅड. सानप आपले विचार व्यक्त करताना पुढे म्हणाले की, आबासाहेबांनी समाजातील दीन-दलित-गोरगरीब, कष्टकरी, ऊस तोडणी कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या उद्धारासाठी आयुष्यभर कार्य केले. विद्यार्थ्यांनी देखील भविष्यात आबासाहेबांप्रमाणे समाज उपयोगी कार्य करावे. संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे यांनी आबासाहेबांनी शिक्षण, पाणी प्रश्नासाठी केलेला संघर्ष विद्यार्थ्यांना सांगितला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विद्यालयाचे माजी विद्यार्थी माननीय सचिन भाकरे तसेच धनंजय घुले यांनी आपल्या विद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला भाकरे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, या विद्यालयातील शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच आज मी मोठ्या पदापर्यंत जाऊन पोहोचलो. यावेळी त्यांनी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. उपशिक्षणाधिकारी धनंजय घुले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच विविध शालेय उपक्रमात सहभाग नोंदवावा असा संदेश दिला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. लक्ष्मण बिटाळ आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, आबासाहेब आयुष्यभर कुटुंबासाठी कमी व समाजासाठी अधिक अशा समर्पित भावनेने जीवन जगले. आबासाहेबांनी शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आपले आयुष्य वेचले. कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून यावेळी विद्यालयात वक्तृत्व, रांगोळी, मेहंदी, चित्रकला, स्लो सायकलिंग, संगीत खुर्ची, लिंबू-चमचा, हस्तकला अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच इयत्ता दहावी, बारावीतील बोर्ड परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्ञानेश्वर गरड व प्रा. जरीना शेख यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड यांनी केला.
COMMENTS