Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावतीत दिव्यांग क्रीडा स्पर्धेत ५४० जणांचा सहभाग

अमरावती : जिद्दीच्या जोरावर अपंगत्वावर मात करीत दिव्यांग बांधव त्यांच्यातील विशेष शक्तीचा उपयोग करून आज विविध क्षेत्र पादाक्रांत करीत आहेत. आपली

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होणार? अजित पवार म्हणाले…
तलाठी परीक्षेतील नवा घोळ
अवैध कत्तलखान्यांविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
May be an image of 1 person and dais

अमरावती : जिद्दीच्या जोरावर अपंगत्वावर मात करीत दिव्यांग बांधव त्यांच्यातील विशेष शक्तीचा उपयोग करून आज विविध क्षेत्र पादाक्रांत करीत आहेत. आपली शक्तीस्थान ओळखून त्यावर कार्य केल्यास यश निश्चित मिळते. हा आत्मविश्वास सर्व दिव्यांग मुला-मुलींनी बाळगावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग व अशासकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला -मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय दिव्यांग मुला- मुलींच्या क्रीडा स्पर्धेनिमित्त हवेत फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दिव्यांग मशाल ज्योत प्रज्ज्वलित करून क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी. एम. पुंड, दिव्यांग विभाग सहायक सल्लागार पी. डी. शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, दिव्यांग मुला-मुलींना प्रशिक्षित करणे हे अत्यंत संवेदनशीलतेचे काम आहे. या विद्यार्थ्यांच्या यशात त्यांच्या शिक्षकांचाही महत्त्वाचा वाटा आहे. दिव्यांग मुला-मुलींमधील विशेष शक्ती ओळखून त्यावर शिक्षक काम करतात. यातून या मुलांना वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत होते. आज अंध विद्यार्थी देखील आयएएस या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होवून आपल्या जबाबदाऱ्या सक्षमतेने सांभाळीत आहेत. तसेच पॅरा ओलंपिक स्पर्धेमध्ये देखील दिव्यांग बांधव यशस्वी होत आहेत. स्वतःवर विश्वास ठेवल्यास यश निश्चित मिळते, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या शिक्षकांचे कौतुक केले. सर्व कार्यक्रमांमध्ये दिव्यांग मुला -मुलींनी सहभाग घ्यावा. अमरावती जिल्हा क्रीडा क्षेत्रात अग्रेसर आहे. स्पर्धेच्या माध्यमातून केवळ जिल्हा व राज्यस्तरावरच नाव न कमावता राष्ट्रीय पातळीवर देखील पोहोचावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली .
दिव्यांगाच्या विशेष शाळा, कर्मशाळेमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना खेळात संधी मिळावी म्हणून जिल्ह्यातील शासकीय मान्यता प्राप्त अनुदानित व कायमस्वरूपी विनाअनुदानित दिव्यांग विशेष शाळा, कर्मशाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा १७ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिव्यांग शालेय विद्यार्थ्यांनी संचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली. तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेत मतिमंद प्रवर्ग, अंध प्रवर्ग, कर्णबधिर प्रवर्ग, अस्थिव्यंग प्रवर्ग तसेच बहु विकलांग प्रवर्गातील ३४ शाळांनी सहभाग नोंदविला असून ५४० दिव्यांग स्पर्धकांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेमध्ये विविध प्रवर्ग व वयोगटानुसार ५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, सॉफ्ट बॉल, सॉफ्ट जम्प, सॉफ्ट बॉल, पोहणे, तीनचाकी सायकल चालविणे, कुबडी घेऊन धावणे अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. पुंड यांनी केले. संचालन प्रयास विशेष शाळेचे विशेष शिक्षक ज्ञानेश्वर आमले यांनी केले.

COMMENTS