दावोस/वृत्तसंस्था ः स्वित्झर्लंडमधील दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात 45 हजार 900 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
दावोस/वृत्तसंस्था ः स्वित्झर्लंडमधील दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात 45 हजार 900 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यातून राज्यात 10 हजार रोजगार निर्माण होतील, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनला मंगळवारी भेट दिली. यावेळी जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत त्यात सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्कच्या ठिकाणी उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
याठिकाणी उद्योगांना अनुकूल असे वातावरण निर्माण केले असून येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टमवर देखील चर्चा झाली. तसेच महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही करण्यात आले. या माध्यमातून सुमारे 10 हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. यावेळी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी लक्झमबर्गचे पंतप्रधान, जॉर्डनचे पंतप्रधान, सिंगापूरचे माहिती व दूरसंचार मंत्री, जपान बँक, सौदी अरेबियाचे उद्योग व खनिकर्म मंत्री, स्वीस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासमवेत भेटी घेत, महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि सुमारे 21 कंपन्यांमध्ये सामंजस्य करार होणार आहे. त्यामुळे राज्यात 1.4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याचा दावा उद्योग मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. यासोबतच येत्या काही वर्षांत राज्यात सुमारे 66,500 रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. पुण्याजवळ जपानच्या निप्रो कार्पोरेशन या उद्योगाचा 1 हजार 650 कोटी रुपये गुंतवणूकीचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प उभारण्यात येत असून यामुळे महाराष्ट्रातील औषध निर्मिती क्षेत्रास चालना मिळणार आहे. यामुळे 2 हजार रोजगार निर्मिती होणार आहे.
महाराष्ट्रावर गुंतवणूकदारांचा विश्वास ः मुख्यमंत्री शिंदे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या निर्मित्ताने गुंतवूणकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देण्यात आल्यामुळे महाराष्ट्रावर गुंतवणूकदारांचा विश्वास असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पहिल्याच दिवशी 45 हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकींचे सामंजस्य करार झाल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटनही करण्यात आले. या पॅव्हेलियनला भेट देऊन महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यासाठी अनेक प्रतिनिधीनी गर्दी केली होती.
औरंगाबाद येथे उभारणार 12 हजार कोटींचा प्रकल्प- औरंगाबाद येथे 12 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्रीनको नविनीकरण ऊर्जेचा (रिन्युअबेल एनर्जी) प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे 6 हजार 300 जणांना रोजगार मिळेल. महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बर्कशायर- हाथवे या उद्योगाच्या 16 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून त्यामुळे नागरी विकासाला चालना मिळणार आहे.
COMMENTS