पुणे/प्रतिनिधी ः घरातील समस्या दूर करण्यासाठी धार्मिक विधी तसेच जादूटोण्याचे उपायासाठी पुण्यातील धानोरी परिसरात राहणार्या एका आयटी अभियंता व्यक

पुणे/प्रतिनिधी ः घरातील समस्या दूर करण्यासाठी धार्मिक विधी तसेच जादूटोण्याचे उपायासाठी पुण्यातील धानोरी परिसरात राहणार्या एका आयटी अभियंता व्यक्तीकडून आणि त्याच्या भावाकडून मिळून तब्बल 28 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पत्नीचा भाऊ आणि भोंदूबाबांनी त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींवर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक कुलकर्णी (वय-35) विजय गोविंद जाधव (वय 30, राहणार-इंदापूर, पुणे), सदाशिव खोडे (वय-37, राहणार-इंदापूर, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शशिकांत पांडुरंग सूर्यवंशी (वय 38, राहणार-धानोरी, पुणे) यांनी सदर आरोपींविरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर आर्थिक फसवणूक तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृती प्रतिबंध व निर्मूलन व काळी जादू अधिनियम 2013 चे कलम तीन नुसार गुन्हा दाखल केला आहे. मार्च 2019 ते ऑगस्ट 2021 या दरम्यान सदरचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शशिकांत सूर्यवंशी यांच्या पत्नीचा मामे भाऊ आरोपी विजय गोविंद जाधव यांच्या ओळखीचे आरोपी अभिषेक कुलकर्णी आणि त्यांचा चालक सदाशिव कोंडे यांनी संगणमत करून तक्रारदार यांना धार्मिक विधी व जादूटोणाचे उपायसाठी विश्वासात घेतले. तक्रारदार यांच्याकडून विविध धार्मिक विधीसाठी व घरातील समस्या दूर करण्यासाठी एकूण 20 लाख 35 हजार रुपये बँक खात्यामार्फत घेण्यात आले. तसेच तक्रारदार यांच्या परिवाराचे व त्यांचा मोठा भाऊ श्रीकांत सूर्यवंशी यांच्या परिवाराचे पूजा करण्यासाठी, त्यांनी गव्हाच्या कणकेचा पुतळा बनवून त्याला दागिने घालण्यास सांगितले. या दागिन्यासहीत पुतळा पुजेसाठी मठात घेऊन गेले. त्यानंतर ते परत आले नाही. दरम्यान लॉकडाऊन सुरु झाल्याने नंतर पैसे, दागिने देतो, असे सांगून आरोपी टाळाटाळ करत होते. अशाप्रकारे एकूण सात लाखांची हजार रुपये किमतीचे 25 तोळे 95 ग्रॅम सोन्याचे दागिने आरोपींनी विश्वसघात करून जादूटोणा व भोंदूगिरी करून तक्रारदार यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक एस शेख पुढील तपास करत आहे.
COMMENTS