अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर तालुक्याच्या माजी खासदार कै. दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील 18 जागांसाठी तब्बल 228 उमेदवार रिंगणात
अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर तालुक्याच्या माजी खासदार कै. दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील 18 जागांसाठी तब्बल 228 उमेदवार रिंगणात दाखल झाले आहेत. यापैकी कितीजण माघारीच्या दिवशी रणछोडदास होतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. नगर तालुक्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची महाविकास आघाडी व भाजपसह नवीन शिंदेसेना यांच्यात या बाजार समितीत चुरस आहे. मागील तीन निवडणुकांतून या बाजार समितीवर भाजपची सत्ता आहे व यावेळी महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारण्याची तयारी केली आहे.
नगर तालुका बाजार समितीच्या 18 जागांपैकी कृषी पतसंस्था मतदार संघातील 11 सदस्यांपैकी सर्वसाधारण 7 जागांसाठी 84, महिला राखीव 2 जागांसाठी 20, इतर मागासवर्गीय प्रवर्ग एका राखीव जागेसाठी 17 व विमुक्त जाती-भटक्या जमाती एका राखीव जागेसाठी 13 उमेदवारांनी अर्ज भरला आहे. तसेच ग्रामपंचायत मतदार संघातील चार जागांपैकी सर्वसाधारण दोन जागांसाठी 43, अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी 10 व दुर्बल घटक एका जागेसाठी 13 अर्ज आले आहेत. याशिवाय व्यापारी-आडते मतदार संघातील दोन जागांसाठी 12 आणि हमाल-मापाडी मतदारसंघातील एका जागेसाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत. सर्व मिळून 18 जागांसाठी 228 अर्ज आले आहेत.
दिग्गज उमेदवार रिंगणात
महाविकास आघाडीकडून संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, अंकुश शेळके, शरद झोडगे, उद्धव दुसुंगे, अजय लामखडे, रामदास भोर, रोहिदास कर्डिले, प्रवीण कोकाटे, दिलीप भालसिंग, अनिल करंडे, राम पानमळकर, तर राजेंद्र बोथरा भाजप-शिंदे गटाकडून माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे नातू अंकूश शेळके, माजी सभापती अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, उद्योजक अजय लामखडे तसेच माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या स्नुषा सुप्रिया अमोल कोतकर, भाजपा नेते शिवाजी कर्डिले यांचे पुतणे संदीप कर्डिले, रोहिदास कर्डिले आदी दिग्गज मंडळी रिंगणात उतरली आहे. गेल्या 15 वर्षांपासून कर्डिले-कोतकरांच्या ताब्यातील बाजार समितीची सत्ता मिळवण्यासाठी नगर तालुका महाविकास आघाडीने जिल्हा परिषद सदस्यांना रिंगणात उतरवले आहे.
COMMENTS