Homeताज्या बातम्यादेश

केरळमध्ये बोट उलटून 21 पर्यटकांचा मृत्यू

10 पर्यटकांना वाचवण्यात यश ः मृतांचा आकडा वाढण्याची भीती

तिरुवनंतपुरम/वृत्तसंस्था ः केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात रविवारी सायंकाळी झालेल्या दुर्घटनेत पर्यटकांची बोट उलटून तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

नेवाश्यात अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई
तुकाई’ प्रकल्प प्रलंबित ठेवणार्‍यांवर कारवाई होणार !
जहाजाला छिद्र अन् उंदरांची दाणादाण ! 

तिरुवनंतपुरम/वृत्तसंस्था ः केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात रविवारी सायंकाळी झालेल्या दुर्घटनेत पर्यटकांची बोट उलटून तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला आहे. बोटीत अतिरिक्त 40 हून अधिक लोक असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बोटीत सुमारे 40 लोक होते. रविवारी सायंकाळी काही प्रवाशी सहलीसाठी समुद्रकिनारी निघाले होते. यावेळी 15 जणांना बसवणारी बोट तब्बल 30-40 प्रवाशांना घेऊन समुद्रात निघाली होती. मात्र जास्त प्रवाशी बसवल्याने बोट हेलकावे खाऊन समुद्रात उलटली. बोट उलटल्याची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यावेळी स्थानिक नागरिकांनी अनेक पीडितांची सुटका केली. बचाव कार्यासाठी पोलीस आणि एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले. मात्र अंधार असल्याने बचाव कार्यात अनेक अडथळे देखील येत होते. बचावासाठी टॉर्च पेटवून लोकांचा शोध घेतला जात असल्याचे व्हिडिओमध्ये सोशल मीडियावरुन समोर आले आहेत. जखमींना परप्पनगडी, थानूर, तिरूर आणि तिरुरंगडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंचेरी मेडिकल कॉलेज आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये अधिक कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जवळपासच्या खासगी रुग्णालयांमध्येही सरकारी डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रचंड गर्दी आणि वाहनांमुळे बचावकार्यात अडथळा येत असल्याने अपघातस्थळी न जाता जनतेने सहकार्य करावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. बचाव कार्यासाठी मलप्पुरम आणि कोझिकोड येथून अग्निशमन दलाच्या अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मलप्पुरमच्या जिल्हाधिकार्‍यांना अपघातस्थळी आपत्कालीन बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बचाव कार्यात समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांचे मुहम्मद रियाझ आणि व्ही अब्दुर रहमान या मंत्र्यांवर सोपवली आहे. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांचे आज होणारे राज्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान केरळच्या पर्यटनमंत्र्यांनी सुद्धा याबाबत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, बोट उलटल्याची माहिती मिळाली. त्यावेळी आम्हाला धक्का लागला. झालेल्या दुर्घटनेत अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. एका शाळेची मुलं त्या बोटीत फिरायला आली होती, अजून मुलं बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजता घडली आहे. आतापर्यंत ज्या लोकांचे मृतदेह पाण्यात सापडले आहेत, त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांवरती उपचार देखील सुरू आहेत. दुर्घटना कशामुळे घडली याचं कारण अद्याप समजलेले नाही. पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करीत आहे.

COMMENTS