2022 सुरू होण्यापूर्वी शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवणार -शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

2022 सुरू होण्यापूर्वी शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवणार -शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील

अहमदनगर  -  जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांमध्ये सहकार्य वृत्ती आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सर्व संघटना कार्यरत आहेत. आपल्या सर्वांच्या सहका

माथेफिरूकडून मुलीची छेड ; शेवगावात पाळला बंद
राज्यात आदिवासी बजेट कायदा अभियान राबविणार
पोस्को अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर

अहमदनगर  – 

जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांमध्ये सहकार्य वृत्ती आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सर्व संघटना कार्यरत आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याचा शैक्षणिक गाडा चालवताना सर्वांना बरोबर घेऊन कार्य करणार आहे . शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची मी माहिती घेतली असून त्यावर काम देखील सुरु झाले आहे. सन 2022 सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागलेले दिसतील असे आत्मविश्वासपूर्ण आश्वासन जिल्ह्याचे  प्राथमिक प्राथमिक विभागाचे  शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांनी दिले.

      श्री.पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा शिक्षणाधिकारी म्हणून पदभार मागील आठवड्यात स्विकारला. त्या निमित्ताने अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, अहमदनगर जिल्हा गुरुमाऊली मंडळ, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक, अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघ, उच्चाधिकार समिती, न पा म न पा शिक्षक संघ, पदवीधर शिक्षक संघ इत्यादी संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी झालेल्या चर्चेमध्ये श्री पाटील बोलत होते.

     यावेळी जिल्हा संघातर्फे फेटा, शाल व बुके देऊन बापूसाहेब तांबे,स लीमखान पठाण, गोकुळ कळमकर यांनी शिक्षणाधिकारी यांचा सत्कार केला.

     जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राचा आढावा घेऊन प्रलंबित प्रश्नांची माहिती आपण घेतली असता शिक्षकांचे पगार एक तारखेला होणे, मुख्याध्यापक व पदवीधर पदोन्नती, फंडाची प्रकरणे आदी प्रश्न महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न सुटले म्हणजे जिल्ह्यातील शिक्षकांचे बहुतांश प्रश्न सुटणार आहेत  म्हणून या प्रश्नांना सोडविण्यासाठी आपण प्राधान्य देणार आहोत. दरमहा पगार वेळेवर होण्यासाठी तालुक्यातून पगार बिले वेळेवर येणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण नियोजन करीत असून प्रत्येक तालुक्याची पगार बिले जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी ठराविक तारीख निश्चित करण्यात येईल. त्या तारखेपर्यंत ज्या तालुक्यांची पगार बिले उपलब्ध होतील तेवढीच काढली जातील उर्वरित तालुक्याची बीले वगळून पगार केले जातील व त्या बाबतची सर्व जबाबदारी संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व तेथील यंत्रणेची राहील असे ही ते म्हणाले.मुख्याध्यापक व पदवीधर यांची पदोन्नती लवकरच केली जाणार असून त्यासाठी काम सुरू आहे असे ही त्यांनी सांगितले.

     कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असल्यामुळे जिल्ह्यातील शाळांचे शैक्षणिक वातावरण पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी सहकार्य करावे. भविष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या विविध स्पर्धा,शिष्यवृत्ती परीक्षा यांचे आयोजन करणार आहोत. शिक्षक बँकेने देखील जिल्हा परिषदेच्या उपक्रमांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा संघाचे नेते तथा अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी जिल्ह्यातील शिक्षक प्रशासनाला सदैव सहकार्य करीत असतात . एकमेकांच्या सहकार्याने आमचे शिक्षक जिल्ह्यामध्ये अतिशय चांगले काम करीत आहेत . शिक्षण विभागाच्या सर्व उपक्रमांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची जिल्हा संघाची भूमिका राहील . जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाच्या सर्व प्रयत्नांना आमची सदैव साथ आहे व राहील असे सांगितले . यावेळी झालेल्या चर्चेमध्ये शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण ,संतोष दुसुंगे,शरद भाऊ सुद्रिक, मनोज कुमार सोनवणे, विठ्ठल फुंदे यांनी सहभाग घेतला. शिक्षक बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप यांनी शिक्षक बँकेच्या विविध योजनांची माहिती नूतन शिक्षणाधिकार्‍यांना दिली.

याप्रसंगी राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, जिल्हा गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे, शिक्षक संघाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष गोकुळ कळमकर, निवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी नवेद मिर्झा, उच्चाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल फुंदे,शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण, संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप,शरद सुद्रिक, राजू राहणे, व्हाईस चेअरमन गंगाराम गोडे, संचालक सुयोग पवार, आर टी साबळे, शिक्षक संघाचे राज्य प्रतिनिधी मच्छिंद्र लोखंडे ,जिल्हा संघाचे सरचिटणीस मनोजकुमार सोनवणे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र गजभार, पारनेर तालुका अध्यक्ष सुर्यकांत काळे, नितीन पंडित, रवींद्र कडूस आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन पंडीत यांनी केले. साहेबराव अनाप यांनी आभार मानले .

कार्यालयीन शिस्त –

     शिक्षणाधिकारी पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या कार्यालयाला शिस्त लावण्यासाठी पावले उचलली आहेत .सर्व कर्मचार्‍यांचे मस्टर त्यांनी स्वतः पहिले दोन दिवस आपल्या टेबलावर ठेवले तसेच सायंकाळी सव्वा सहा वाजल्याशिवाय कोणत्याही कर्मचार्याने कार्यालय सोडू नये या बाबतच्या सूचना त्यांनी दिल्या.दररोजच्या फायली दररोज निकाली काढण्याचे त्यांचे धोरण असून त्यासाठी ते संध्याकाळी उशिरापर्यंत कार्यालयात थांबतात.आज अखेर एक ही फाईल पेंडिंग नाही याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

बापू तांबे सर्व संघटनांचे नेते –

     शिक्षक संघटना व बँकेच्या पदाधिकारी यांचा परिचय यावेळी शिक्षण अधिकार्‍यांना करून देण्यात आला. बापूसाहेब तांबे यांच्या बद्दल बोलताना रवींद्र कडूस यांनी बापूसाहेब हे जिल्ह्यातील सर्व संघटनांचे नेते आहेत असा उल्लेख करताच एकच हशा पिकला. शिक्षणाधिकार्‍यांनी सुद्धा बापू साहेबांबद्दल खूप काही ऐकलं आहे असे सांगून जिल्ह्यात काम करतांना आपल्या सर्वांचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

पगार शिक्षक बँकेत दया –

जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार स्टेट बँक की सेंट्रल बँक या घोळात आठवडाभर उशिरा होतात. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची खाती शिक्षक बँकेत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने शिक्षकांचे पगार शिक्षक बँकेत द्यावेत . ज्या दिवशी चेक मिळेल त्याच दिवशी पगार शिक्षकांच्या खात्यावर जमा करू याबाबत विचार व्हावा अशी मागणी माजी चेअरमन सलीमखान पठाण यांनी केली . यासंदर्भातही माहिती घेऊ आणि शक्य असल्यास कार्यवाही करू असे शिक्षण अधिकार्‍यांनी सांगितले.

COMMENTS