नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरतांना दिसून येत आहे. महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि तपास यंत्रणांचा वापर करून, विरोधकांची मुस्कटद
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरतांना दिसून येत आहे. महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि तपास यंत्रणांचा वापर करून, विरोधकांची मुस्कटदाबी करण्याच्या विरोधात मंगळवारी विरोधक राज्यसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. या गदारोळामुळे राज्यसभेतील 19 खासदारांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले. यापूर्वी सोमवारी (ता. 25) काँग्रेसच्या चार खासदारांना निलंबित करण्यात आले होते. खासदारांना सभागृहाच्या वेलमध्ये घुसून घोषणाबाजी केल्यामुळे आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
संसदेच्या अधिवेशनाच्या सुरुवातीपासून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधीपक्ष संसदेच्या कामकाजात अडथळा आणत असल्याचा सरकारचा आरोप आहे. सरकार या मुद्द्यांवर चर्चेपासून पळ काढत असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. मंगळवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी खासदारांनी महागाईवर निषेध नोंदवण्यास सुरुवात केली. सभागृहात घोषणाबाजी करीत विरोधी खासदार वेलच्या अगदी जवळ आले. विरोधी पक्षाच्या खासदारांना सभापतींकडून वारंवार जागेवर बसण्याचा आग्रह केला जात होता. राज्यसभेत गदारोळ केल्याप्रकरणी विरोधी खासदारांवर कारवाई करण्यात आली. उपसभापतींनी तृणमूलच्या खासदार सुष्मिता देव, मौसम नूर, शंतनू सेन, नदीमल हक, अभि रंजन बिस्वास, शांता छेत्री, आणि डोला सेन हे तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार आहेत. तसेच मोहम्मद अब्दुल्ला, ए. ए. रहीम, एल. यादव आणि व्ही. शिवदासन, अबीर रंजन बिस्वास, नदीमुल हक यांना निलंबित केले. राज्यसभेतून आठवडाभरासाठी निलंबित केलेल्या खासदारांपैकी सात खासदार हे टीएमसी पक्षाचे आहेत. सोमवारी लोकसभेत विरोधी खासदारांनी महागाई आणि जीएसटीच्या वाढत्या दरांविरोधात निदर्शने केली. लोकसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेसच्या चार खासदारांवर कारवाई करण्यात आली. मणिकम टागोर, टीएम प्रतापन, ज्योतिमनी, रम्या हरिदास यांना हंगामासाठी निलंबित करण्यात आले. ईडीने मंगळवारी सोनिया गांधी यांची चौकशी केली. ईडीच्या कारवाईच्या विरोधात काँग्रेसने संसदेपासून रस्त्यापर्यंत गदारोळ केला.
या खासदारांचा समावेश
राज्यसभेच्या 19 खासदारांमध्ये मौसम नूर, एल. यादव, व्ही. शिवदासन, अबीर रंजन बिस्वास, सुष्मिता देव, शांता छेत्री, मोहम्मद अब्दुल्ला, ए.ए. रहीम, कनिमोझी, डॉ. शांतनु सेन, नदीम-उल-हक, डोला सेन, आर वड्डीराजू, एस कल्याणसुंदरम, आर गिरंजन, एन आर एलांगो, एम षणमुगम, दामोदर राव दिवाकोंडा आणि पी संदोष कुमार यांचा समावेश आहे.
सरकारकडून आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न : काँगे्रस
देशातील महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर याविरोधात विरोधकांनी संसदेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशातच या खासदारांचे निलंबन झाल्याने विरोधक आता आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. खासदारांच्या निलंबनावर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. खासदारांना निलंबित करून सरकार आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे, सामान्य जनतेला जे मुद्दे आहेत तेच खासदार मांडण्याचा प्रयत्न करत होते, असे पक्षाने म्हटले होते.
COMMENTS