Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील गणेशोत्सवावर 1800 ‘सीसीटीव्ही’ कॅमर्‍यांची नजर

पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवात राज्य, तसेच देशाच्या वेगवेगळ्या भागांतून भाविक येतात. उत्सवी गर्दीवर शहरातील 1800 सीसीटीव्ह

राज्यात गणेशोत्सवादरम्यान 16 भक्तांचा मृत्यू
यंदाही गणेशोत्सव, दिवाळी होणार गोड
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज

पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवात राज्य, तसेच देशाच्या वेगवेगळ्या भागांतून भाविक येतात. उत्सवी गर्दीवर शहरातील 1800 सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत. पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. उत्सवाच्या काळातील अनुचित घटना, दागिने, मोबाइल चोरीच्या घटना रोखणे तसेच संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.
उत्सवाच्या काळात शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचारी, गुन्हे शाखेची पथके, महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेले दामिनी पथक, साध्या वेशातील पोलीस कर्मचार्‍यांचे पथक शहराच्या वेगवेगळ्या भागात गस्त घालणार आहेत. पुणे पोलिसांनी बसवलेले एक हजार 300 कॅमेरे, स्मार्ट सिटी योजना, महापालिकेच्या 500 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर उत्सवी गर्दीवर राहणार आहे. शहरात अडीच हजारहून जास्त नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला आहे. मंडळांनी उत्सवाच्या कालावधीत मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मंडपाच्या परिसरातील रस्त्यांवर कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाजी रस्ता परिसरातील बुधवार चौक ते मंडईतील गोटीराम भैय्या चौक दरम्यान उत्सवाच्या कालावधीत भाविकांची मोठी गर्दी असते. मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना भागात होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून गर्दीचे नियंत्रण करणे शक्य होईल. बंदोबस्तावरील पोलीस कर्मचार्‍यांनी याबाबतच्या सूचना देण्यात येतील. सदाशिव पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ भागातील अंतर्गत भागातील दुकानदार, व्यावसायिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची पोलीस आयुक्तालय, उपायुक्त कार्यालय जोडणी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयातील मुख्य नियंत्रण कक्षातून उत्सवी गर्दीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी कोथरुड परिसरातून अटक केली. संभाव्य दहशतवादी हल्ला, घातपाती कारवाया विचारात घेऊन पोलिसांकडून उत्सवाच्या काळात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

COMMENTS