रांची ः नक्षलविरोधी अभियानाअंतर्गत गुरुवारी चाईबासा जिल्ह्यातील सारंडा जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवादी संघटनेमध्ये भीषण चकमक झाली. छोटानागरा

रांची ः नक्षलविरोधी अभियानाअंतर्गत गुरुवारी चाईबासा जिल्ह्यातील सारंडा जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवादी संघटनेमध्ये भीषण चकमक झाली. छोटानागरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घनदाट आणि दुर्गम जंगलात ही चकमक झाली. या चकमकीत एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर असलेला नक्षलवादी अनल याच्यासह त्याचे 9 ते 10 साथीदारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत झारखंड पोलीस, कोब्रा बटालियन आणि केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान संयुक्तपणे जंगलात शोधमोहीम राबवत होते. याच वेळी दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केल्याने चकमकीला तोंड फुटले. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी कारवाई केल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली. सूत्रांच्या माहितीनुसार, ही चकमक एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या कुख्यात नक्षलवादी अनल दा यांच्या पथकाशी झाली. त्यांच्या गटात 14 हून अधिक नक्षलवादी असल्याचे सांगितले जाते. चकमकीत मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी ठार झाल्याचा दावा करण्यात येत असून, अनल दा याचाही मृत्यू झाल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. सारंडा हा दुर्गम डोंगराळ आणि घनदाट जंगलांचा भाग असून, नक्षलवादी हालचालींसाठी ओळखला जातो. त्यामुळे संपूर्ण परिसराला वेढा घालून व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे. अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून, परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. कोल्हान विभागाचे डीआयजी अनुरंजन किस्पोट्टा यांनी चकमक सुरू असल्याची माहिती दिली असून, ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतरच सविस्तर तपशील जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या कारवाईत 50 लाख रुपयांचे बक्षीस असलेला एक वरिष्ठ नक्षलवादी कमांडरही ठार झाल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे.

COMMENTS