संगमनेर/प्रतिनिधीपुणे नाशिक महामार्गावरील हिवरगाव टोल प्लाझा येथे स्थानिक वाहनांना टोल ची सवलत असतानाही गेल्या अनेक दिवसांपासून टोल प्रशासनांकडून
संगमनेर/प्रतिनिधी
पुणे नाशिक महामार्गावरील हिवरगाव टोल प्लाझा येथे स्थानिक वाहनांना टोल ची सवलत असतानाही गेल्या अनेक दिवसांपासून टोल प्रशासनांकडून फास्ट टॅगच्या नावाखाली स्थानिक वाहनांची छुप्या पद्धतीने टोल वसुली सुरु होती. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करूनही टोल प्रशासन आपल्या मनमानी कारभार हाकत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आज बुधवार दि.८ रोजी संतप्त संगमनेरकरांनी हिवरगाव पावसा टोल नाक्यावर धडक देत टोल प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात रस्ता रोको व ठिय्या आंदोलन केले.
यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवित टोल प्रशासनासमोर आपल्या मागण्या मांडल्या. यामध्ये स्थानिक वाहनधारकांसाठी फास्टट्रॅक विरहीत स्वतंत्र लेन करणे, महामार्गावरील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवणे तसेच बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट सुरू करून देणे, सर्विस रस्ते दुरुस्त करणे, बनविलेले सर्विस रस्ते तात्काळ करणे, महामार्ग लगत असलेल्या गटारी पूर्ण करणे, महामार्गालगत मध्यभागी व सर्व्हिस रोड ला असलेल्या झाडांची छाटणी करणे यासह इतर विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत. या आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ, राजू खरात, जनार्दन आहेर, अमर कतारी, पप्पू कानकाटे, अविनाश थोरात यांसह शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी टोल प्रशासनाने नागरिकांच्या मागण्या मान्य केल्या असल्या तरी पुढील एक महिन्यात स्थानिक वाहनांची टोल वसूली झाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
कशी होते छुपी टोल वसुली?
हिवरगाव टोल प्लाझा येथे स्थानिक वाहनांना आपले ओळखपत्र दाखवून जाण्याची मुभा आहे. परंतु टोल प्रशासनाकडून फास्ट टॅग असलेल्या स्थानिक वाहनांचे गाडी क्रमांक नोंद करून घेतली जातात. यावेळी टोलवर आलेल्या स्थानिक वाहनांना ओळखपत्र दाखवून सोडण्यात येते. परंतु दोन दिवसांनी याठिकाणाहून गेलेल्या स्थानिक वाहनांचे क्रमांक संगणीकात नोंदवून ऑनलाईन पद्धतीने स्थानिक फास्ट टॅग धारकांच्या खात्यातील पैसे कमी केले जातात. अशा पद्धतीने सामान्य संगमनेरकरांची लूट गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.
COMMENTS