दहशतवाद विरोधी पथकाने मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी आणखी छापे टाकून मोठी माहिती जमविली आहे.
मुंबई/प्रतिनिधीः दहशतवाद विरोधी पथकाने मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी आणखी छापे टाकून मोठी माहिती जमविली आहे. दोन मार्चला हिरेन यांच्या हत्येचा कट शिजला होता, अशी माहिती मिळाली आहे. त्यातच त्यांच्या हत्येसाठी वापरलेली कार दमण, दीवमधून ताब्यात घेतली आहे. शिवाय या प्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे याची गोपनीय डायरी जप्त करण्यात आली असून त्याने रोख रक्कम कुणाकुणाला दिली, याचा शोध घेतला जात आहे.
एटीएसच्या पथकाने दमण येथून व्होल्वो कार जप्त केली आहे. ही कार फॉरेन्सिक तपासणीसाठी मुंबईला आणली आहे. ही गाडी दमणच्या व्यावसायिकाची असल्याचे सांगितले जात आहे. एनआयएच्या टीमनेही या प्रकरणात चौकशी केली आहे. मनसुख मृत्यू प्रकरणात एटीएसने ही पहिली कार जप्त केली आहे. यापूर्वी अँटिलीया प्रकरणात एनआयएने 5 वाहने जप्त केली होती. यात दोन मर्सिडीज, एक स्कॉर्पिओ, एक प्राडो आणि सरकारी इनोव्हाचा समावेश आहे. अहमदाबादमधून अटक केलेल्या व्यक्तीकडे 11 सिम कार्ड सापडली. ही कार्ड हिरेनच्या हत्येसाठी वापरण्यात आली. यापैकी एका सिममधून, 4 मार्चच्या रात्री 8 ते रात्री 8.30 या वेळेत मनसुखला व्हॉट्सअॅप कॉल करण्यासाठी वापर केला जात होता. अँटिलिया प्रकरणाचा तपास करणा-या एनआयएच्या पथकाला वाझे आणि हिरेन यांच्या व्यतिरिक्त 11 लोक या कटात सामील असल्याचे समजले. त्यातील काही सेवानिवृत्त तर काही सध्याचे पोलिस आहेत. त्यांना लवकरच अटक केली जाऊ शकते. एटीएस मनसखच्या बेपत्ता होण्याच्या प्रत्येक दुव्याला जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रकरणात अटक केलेले माजी पोलिस विनायक शिंदे यांनी दोन मार्चपासून मनसुखच्या हत्येचे नियोजन सुरू केल्याचा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे याने मनसुखच्या हत्येविषयी अनेक रहस्ये उलगडली आहेत. एटीएस यावर पुरावे गोळा करीत आहे. एटीएसच्या दोन पथकांनी सोमवारी रात्री सचिन वाझेच्या ठाण्यातील माजिवडा परिसरातील कार्यालये आणि दुकानांवर छापा टाकला. या पथकाने भिवंडीस्थित मोटोजर्सन ऑटो मोबाइल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवरही छापे टाकले.
कारखान्याच्या मालकाला अटक
एटीएसच्या चौकशीत असे आढळले, की हत्येसाठी वापरलेली सिमकार्ड अहमदाबादमधील एका कारखान्यात काम करणार्या काही लोकांच्या नावावर आहेत. या कारखान्याने 30-40 कर्मचार्यांना सिम कार्डची सुविधा दिली आहे. या सिमकार्ड्सचा उपयोग मनसुखच्या हत्येच्या कट रचण्यात आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ पार्क करण्यासाठी केला गेला होता. याप्रकरणी मुंबई एटीएस आणि गुजरात पोलिसांच्या पथकाने कच्छच्या अहमदाबाद, पालनपूर आणि बोडकदेव येथे छापे टाकले. अटक केलेली व्यक्ती कारखान्याचा मालक असल्याचे सांगितले जात आहे. त्यानेच कामगारांच्या नावावरची कार्ड उपलब्ध करून दिली.
COMMENTS