स्वबळाचा फुसका बार

Homeसंपादकीय

स्वबळाचा फुसका बार

कोणत्याही राजकीय पक्षाला त्याचे संघटन, बळ वाढविण्याचा अधिकार आहे; परंतु जेव्हा सरकारमध्ये एकाहून अधिक पक्ष असतात, तेव्हा स्वबळाची भाषा सरकारला धोका तर करीत नाही ना, याचा विचार सत्ताधारी आघाडीतील प्रत्येक पक्षाने करायला हवा. काँग्रेसची देशातील जी अवस्था आहे, ती पाहता महाराष्ट्रासारखे राज्य हातातून जाणार नाही, याची दक्षता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी नक्कीच घेत असतील. 

न्यायपालिका – सरकार संघर्ष वाढणार
आम्ही मूकनायकाचे वारसदार
दुष्काळ दारात…

कोणत्याही राजकीय पक्षाला त्याचे संघटन, बळ वाढविण्याचा अधिकार आहे; परंतु जेव्हा सरकारमध्ये एकाहून अधिक पक्ष असतात, तेव्हा स्वबळाची भाषा सरकारला धोका तर करीत नाही ना, याचा विचार सत्ताधारी आघाडीतील प्रत्येक पक्षाने करायला हवा. काँग्रेसची देशातील जी अवस्था आहे, ती पाहता महाराष्ट्रासारखे राज्य हातातून जाणार नाही, याची दक्षता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी नक्कीच घेत असतील. 

    प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक आहेत. काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठीच त्यांची नियुक्ती आहे; परंतु पटोले, नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार काँग्रेस वाढविण्यापेक्षा सरकारची डोकेदुखी वाढवित आहेत. केंद्र सरकार एकीकडे राज्य सरकारची कोंडी करीत आहे. सीबीआय, ईडी, प्राप्तिकर खाते यांसारख्या संस्थांचा वापर करून भारतीय जनता पक्ष सरकारच्या मागे चौैकशीचा ससेमिरा लावीत आहे. सरकार एकीकडे कोरोना, आर्थिक स्थिती, नैसर्गिक संकटे यांचा सामना करीत असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार राज्य सरकारची विकासकामांच्या बाबतीतही अडवणूक करीत आहे. देशाला कराच्या साठ टक्के रक्कम महाराष्ट्र देत असताना या महाराष्ट्राचे देणेही केंद्र सरकार वेळेवर परत करीत नाही. अशा संकटाशी सरकारमधील तीनही पक्षांनी एकत्रितपणे मुकाबला करायला हवा; परंतु तसे न करता सरकारमधील तीनही पक्षांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे भाजपचे फावते आहे. गेल्या दीड वर्षापासून सरकारमधील तीन पक्षांत विसंवाद आहे. परस्परांना शह-काटशह देण्यात सरकारमधील तीनही पक्ष धन्यता मानीत आहेत. भारतीय जनता पक्षाविरोधात लढायचे, की आपसांत लढायचे, हा संभ्रम दूर करायला हवा. किमान समान कार्यक्रमावर सरकार चालवायचे असेल, तर त्याची जाणीव ठेवून सरकारमधील पक्षांनी कारभार करायला हवा. पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढायचा निर्धार केला. मुंबई महापालिकेसह अन्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या काही दिवसांत होणार आहेत. त्याची तयारी वेगवेगळ्या पक्षांनी सुरू केली आहे. तसे करतााना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जसा समन्वय आहे, तसा तो काँग्रेसमध्ये नाही. काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात उत्तर दिले. त्यामुळे पटोले यांनी काहीशी मवाळ भूमिका घेतली; परंतु त्यांना अधूनमधून उबळ येत राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पटोले यांना उपहासात्मक शुभेच्छा दिल्या. एकीकडे हे होत असताना दुसरीकडे पटोले यांच्या स्वबळाच्या भाषेला काँग्रेसमधूनच विरोध होत होता. बाळासाहेब थोरात यांनी तर पक्षश्रेष्ठींकडून स्वबळाच्या कोणत्याही सूचना नाहीत, असे सांगितले. पृथ्वीराज चव्हाण यांनीही पटोले यांचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी फार गांभीर्याने घेऊ नये, असे म्हटले. पराभूतांनाच स्वबळाची खुमखुमी असते. पवार यांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेतली नसती, तर गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दोन आकडी संख्याही गाठता आली असती, की नाही, याबाबत संभ्रम होता. या पार्श्‍वभूमीवर दिल्लीला लक्ष्य घालून महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना समज देणे आवश्यक होतेच. स्वबळावर निवडणुकीचा नारा देऊन काँग्रेसने राज्यात एकच खळबळ उडवून दिली होती; पण ’मी एकीकडे ईडी आणि सीबीआय या राष्ट्रीय तपास यंत्रणेशी लढा देत असताना माझ्यासोबतच लढण्याची भाषा वापरणे हे कितपत योग्य आहे? अशाने सरकार तरी कसे चालेल’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पटोले यांना दिल्लीला बोलावून चांगलाच समज देण्यात आली. प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पटोले यांनी जोरदार बॅटिंग करत भाजपला अंगावर घेतले; पण अलीकडे स्वबळाचा नारा देऊन मित्रपक्षांना चांगलाच धक्का दिला. त्यामुळे अखेर पक्षश्रेष्ठींनीच पटोले यांना वेसण घातली. पटोले दिल्लीला पोहोचल्यानंतर काँग्रेस पक्षाचे प्रभारी आणि सरचिटणीस एच. के. पाटील व के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबत बैठक घेतली. ठाकरे यांनी पटोले यांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. ’राज्यात एकीकडे ईडी आणि सीबीआय या राष्ट्रीय तपास यंत्रणांनी आमदार आणि मंत्र्यांना टार्गेट केले आहे. अशा परिस्थितीत आम्हीही त्यांच्याशी लढा देत असताना काँग्रेसकडून स्वबळाची भाषा कशाला? राज्य कसे चालवायचे? लोकांमध्ये आपण एकत्र आहोत, याचा संदेश कसा जाणार? अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यातून योग्य तो संदेश दिला गेला. ठाकरे यांनी थोरात, अशोक चव्हाण यांच्याकडेसुद्धा आपली नाराजी बोलून दाखवली होती. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीच्या वरिष्ठांकडे याबद्दल माहिती दिली होती; पण पटोले यांच्याकडून राज्यात स्वबळाची नारेबाजी सुरूच होती. त्यामुळे अखेरचा उपाय म्हणून ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना फोन करून याबद्दल माहिती दिली. बैठकीनंतर महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी, ’स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा प्री मॅच्युअर आहे. आत्ता तो विषय नाही,’ असे जे म्हटले, ते पुरेसा इशारा देणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात स्वबळाचा नारा देणारे पटोले हे दिल्लीत गारद पडले आणि त्यांचा स्वबळाचा नारा हा फुसका बार ठरला आहे.  ‘मी ईडी आणि सीबीआयशी लढत आहे, आणि तुम्ही माझ्याशीच लढण्याच्या गोष्टी करता? हे कितपत योग्य आहे? अशाने सरकार कसे चालेल?’ अशा शब्दांतील ठाकरे यांचा इशारा अखेर जालीम उपाय ठरला. महाविकास आघाडी हा तात्पुरता उपाय आहे, असे सांगणार्‍या पटोले यांना आता स्वबळाचा अर्थ चांगलाच कळला असेल.

COMMENTS