स्थायी समितीने वाढवले 24 कोटीने बजेट ; आजपासून मनपा महासभेत होणार चर्चा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्थायी समितीने वाढवले 24 कोटीने बजेट ; आजपासून मनपा महासभेत होणार चर्चा

महापालिकेचे यंदाचे प्रशासनाने सादर केलेले बजेट स्थायी समितीने आणखी सुमारे 24 कोटीने वाढवले आहे.

मूलभूत प्रश्‍न सोडवा अन्यथा आंदोलन ः हर्षदाताई काकडे
महामानव डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीयांकडून अभिवादन..
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सुविधांचे नियोजन करा : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

अहमदनगर/प्रतिनिधी-महापालिकेचे यंदाचे प्रशासनाने सादर केलेले बजेट स्थायी समितीने आणखी सुमारे 24 कोटीने वाढवले आहे. हे बजेट आता अंतिम मंजुरीसाठी मनपा महासभेत सादर करण्यात आले आहे व त्यावर बुधवारपासून (31 मार्च) सर्व नगरसेवक चर्चा करणार आहेत. दरम्यान, विभाग प्रमुखांनी उशिरा त्यांचे प्रस्ताव दिल्याने मनपाच्या बजेटला यंदा उशीर झाल्याचे म्हणणे मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर यांनी मांडल्याने ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले यांनी नाराजी व्यक्त केली व सर्व विभाग प्रमुखांकडून खुलासा घेण्याची मागणी केली. बुधवारी महासभेत या सर्वांनी उपस्थित राहून बजेटला उशीर का झाला, याचे म्हणणे मांडावे, अशीही मागणी त्यांनी केली.

मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी स्थायी समितीसमोर 12 दिवसांपूर्वी मनपाचे यंदाचे बजेट सादर केले होते. त्यांनी 684 कोटी 89 लाखाचे बजेट मांडले होते. स्थायी समितीने दोन दिवस चर्चा करून त्यात काही शिफारशी केल्या व बजेट 706 कोटी 65 लाखाचे केले आहे. स्थायी समितीने 23 कोटी 72 लाखाचे उत्पन्न व खर्च वाढीव नमूद करून हे बजेट महासभेला सादर केले आहे. आता त्यावर महासभेत अंतिम चर्चा होताना नगरसेवकांच्या सूचना व मागण्या विचारात घेऊन महापौर बाबासाहेब वाकळे हे बजेट अंतिम करणार आहे. महासभेतील चर्चेनंतर हे बजेट आणखी सुमारे 50 कोटीने वाढेल, अशी अपेक्षा आहे.

नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त

स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांना बजेट सादर केले. यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपमहापौर मालनताई ढोणे, नगरसेवक रवींद्र बारस्कर व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी सभापती घुले यांनी मनोगतही व्यक्त केले. या ऑनलाईन महासभेत काही नगरसेवक प्रत्यक्षात मनपा सभागृहात उपस्थित होते. ऑनलाईन चर्चेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लता शेळके, नगरसेविका सोनाली चितळे व अन्य नगरसेवक सहभागी झाले होते तर मनपा सभागृहात गणेश भोसले, श्याम नळकांडे, प्रकाश भागानगरे, अक्षय उनवणे, भय्या गंधे, सचिन शिंदे आदी सहभागी झाले होते. यावेळी यंदाच्या बजेटला उशीर झाल्याबद्दल नगरसेवक भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने डिसेंबर 2020मध्येच स्थायी समितीकडे प्रस्ताव दिला होता तसेच नंतर विभाग प्रमुखांनी त्यांच्या उत्पन्न व खर्चाचे प्रस्ताव वेळेत दिले नाही, असा दावा लेखाधिकारी मानकर यांनी केला. त्यावर मग भोसले यांनी बुधवारी सर्व विभाग प्रमुखांनी महासभेत यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.

स्थायी वाढवले उत्पन्न

-स्थायी समितीने महासभेला शिफारस करताना सर्वसाधारण कर वसुली 6 कोटीने वाढवली

-बिगरशेती जमिनीवरील कर 60 लाखाची अपेक्षा व्यक्त केली.

-नोटीस व शास्ती फी 1 कोची 75 लाखाने वाढवली

-अनधिकृत बांधकामे नियमित करण्यातून आणखी 1 कोटी अपेक्षित

-अतिरिक्त चटईक्षेत्र प्रिमीयम 1 कोटीने वाढवला.

-अनधिकृत नळ कनेक्शन नियमित करण्यातून 1 कोटी वाढवले.

-पाणीपट्टी वसुली 2 कोटीने वाढवली.

स्थायीने वाढवले खर्च

-सावेडी गावठाणातील शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी 5 कोटी

-महापौर शहर विकास निधी 2 कोटी तसेच उपमहापौर,स्थायी समिती समिती सभापती व सभागृह नेता शहर विकास निधी प्रत्येकी 50 लाखाप्रमाणे दीड कोटी तसेच विरोधी पक्ष नेत्याला 25 लाख, महिला व बालकल्याण समिती सभापतीला 15 लाख व उपसभापतींना 10 लाख असे सर्व मिळून 4 कोटीचा विकास निधी वाढवला.

-विकास योजना सुधारित करण्यासाठी 3 कोटी

-अमृत भुयारी गटार योजना उपनगरांसाठी 5 कोटी

COMMENTS