साईसंस्थानला आरटीपीआर लॅबसह ऑक्सिजन प्लान्ट करण्याचे आदेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साईसंस्थानला आरटीपीआर लॅबसह ऑक्सिजन प्लान्ट करण्याचे आदेश

शिर्डीच्या साईबाबा संस्थानला आरटीपीआर लॅब व ऑक्सिजन प्लान्ट युद्धपातळीवर स्थापन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

जायकवाडी पाणी प्रश्‍नावर 12 डिसेंबरला कोल्हे कारखान्याच्या याचिकेची सुनावणी 
कर्मवीर शिक्षणक्षेत्रातील जननायक ः प्राचार्य टी. ई. शेळके
दुर्गा भवानी ज्योतींचे नेवासा शहरात उत्स्फूर्त स्वागत

अहमदनगर/प्रतिनिधी- शिर्डीच्या साईबाबा संस्थानला आरटीपीआर लॅब व ऑक्सिजन प्लान्ट युद्धपातळीवर स्थापन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. तसेच नगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी कोरोनासाठी जिल्ह्यात विविध रुग्णालयांना लागणारी औषधे व यंत्रसामुग्रीच्या मागणीचा अहवाल तातडीने शासनास सादर करण्याचेही आदेश दिले आहे.

कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोवीड-19 चा प्रादुर्भाव व दुसर्‍या लाटेत वाढणारी रुग्णाची संख्या लक्षात घेता साईबाबा संस्थान ट्रस्ट येथे नवीन आरटीपीसीआर लॅब स्थापन करून कोवीड रुग्णांची तातडीने चाचणी करण्याची सोय व्हावी तसेच डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय यांची तातडीने भरती व्हावी तसेच साईबाबा संस्थानला कोरोनावर मात करण्यासाठी लागणारी औषधे तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत दि. 8 एप्रिल 2021 रोजी जनहित याचिकेमध्ये दिवाणी अर्ज करून उच्च न्यायालयात मागणी केली. प्रधान जिल्हा न्यायाधीश (नगर), साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त विभागीय आयुक्त (नाशिक) व सह धर्मादाय आयुक्त (नगर) यांची तदर्थ समिती धोरणात्मक व आर्थिक निर्णय उच्च न्यायालयाच्या परवानगीने घेत आहे. ही समिती ऑक्टोबर 2019 पासून साईबाबा संस्थानचा कार्यभार सांभाळत आहे. तदर्थ समितीला याचिकाकर्ते यांनी वरील विषयावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी पत्रव्यवहार केले होते तसेच याचिकाकर्ते काळे व सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी साईबाबा संस्थानच्या तदर्थ समिती, डॉक्टर्स, नर्सेस, अधिकारी व इतर यांना संपर्क करून वरील बाबींबाबत कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा देखील केला होता.

त्याअनुषंगाने मंगळवारी दि. 20 एप्रिल 2021 रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व. न्यायमूर्ती एस. डी. कुलकर्णी यांनी साईबाबा संस्थान ट्रस्ट येथे नवीन आरटीपीसीआर लॅब लवकरात लवकर युद्धपातळीवर स्थापन करण्याचे आदेश दिले. या लॅबचा भविष्यात पॅथॉलॉजिकल लॅब म्हणून उपयोग करावा, असेही आदेश दिले. संस्थानच्या काही तज्ञ डॉक्टर्सनी आरटीपीसीआर लॅबमधील कामाचे प्रशिक्षण देखील घेतले आहे, असे देखील संस्थानच्यावतीने सांगण्यात आले. तसेच सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीनुसार संस्थानच्या हॉस्पिटलला लागणारे डॉक्टर्स, नर्सेस आदी पदे तातडीने भरण्याचे आदेश दिले. तसेच साईबाबा संस्थानला कोरोनावर मात करण्यासाठी लागणारी औषधे तातडीने खासगी कंपनीकडून विना टेंडर प्रक्रियेने खरेदी करण्याचे आदेश दिले. तसेच नगरचे जिल्हाधिकारी यांनी कोरोनासाठी जिल्ह्यात विविध हॉस्पिटलला लागणारी औषधे, यंत्रसामुग्रीच्या मागणीचा अहवाल तातडीने शासनास सादर करून शासनाने या हॉस्पिटलला योग्य दारात औषधे, यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

याशिवाय साईबाबा संस्थानच्या ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देत उच्च न्यायालयाने हा प्लान्ट युद्धपातळीवर तातडीने उभा करावा व जास्त ऑक्सिजन निर्मिती झाल्यास जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांना पुरवावा, असे देखील आदेश दिले. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे यांनी काम पाहिले तर शासनाच्यावतीने अ‍ॅड. एस. जी. कार्लेकर, तर संस्थानच्यावतीने अ‍ॅड. अनिल बजाज यांनी काम पाहिले.

COMMENTS