सत्तेचा दुष्काळ हटविण्यासाठी शंखनाद!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

सत्तेचा दुष्काळ हटविण्यासाठी शंखनाद!

सर्व शक्तीमान परमेश्वर,सृष्टी नियंत्रक,संचालक परमशक्तीसमोर माणूस विनाकारण नतमस्तक होत नाही.आले देवाजीचे मना तिथे कुणाचे चालेना ही मात्रा चांगली ठाऊक

पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी सौ. मंगल कांबळे बिनविरोध
कर्मवीर काळे यांच्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ’ कार्यक्रम
महिलेच्या घरी आढळले 12 हजार लिटर पेट्रोल; 77 रुपये प्रतिलिटर दराने विक्री

सर्व शक्तीमान परमेश्वर,सृष्टी नियंत्रक,संचालक परमशक्तीसमोर माणूस विनाकारण नतमस्तक होत नाही.आले देवाजीचे मना तिथे कुणाचे चालेना ही मात्रा चांगली ठाऊक असल्याने येणाऱ्या संकटापासून संरक्षण मिळावे म्हणून देवाच्या दारात भक्तीची दक्षिणा ठेवण्याची मानसिकता चांगलीच रूळली आहे,हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर प्रोटेक्शन टॕक्स म्हणून भक्तीची गर्दी झाली आहे असे म्हटले तर अजिबात नास्तिकता ठरणार नाही,महाराष्ट्रात विरोधकांनी मंदीराबाहेर केलेला शंखनादही असाच प्रोटेक्शन टॕक्स होता,असे म्हटले तर वावगे ठरू नये.सत्तेच्या दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी देवाच्या दारात शंखनाद झाला या नजरेनेच विरोधकांनी मंदीर बंद विरोधी आंदोलनाकडे पहावे लागेल.
सन २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक वातावरण पार बदलून गेले आहे.कालचे मित्र आज प्रतिस्पर्धी झालेत तर शत्रू गळ्यात गळे घालून सुखनैव नांदत आहेत.त्रिशंकू विधानसभा  अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्र एका रात्रीत बदलून गेला.पंचवीस वर्षांची अखंड मैत्री संपूष्टात येऊन सेना भाजप समोरासमोर उभे ठाकले तर काॕग्रेस राष्ट्रवादीशी अभूतपुर्व आघाडी करून शिवसेनेने राज्याचे नेतृत्व स्वीकारले.तेंव्हापासून सर्वाधिक जागा पदरात पडून विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की ओढवल्याने सैरभैर झालेला भारतीय जनता पक्ष शिवसेनेला पाण्यात पाहू लागला आहे सरकारचे नेतृत्व उध्दव ठाकरे करतात ही सल सतत टोचत असल्याने सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजप नेते सोडत नाहीत.केंद्रात असलेल्या सत्तेचाही या संधीचे सोने करण्यासाठी फायदा उपटला जात आहे.महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून सरकारच्या कारभारावर सातत्याने टिका सुरू आहेच,दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप करून केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने युध्द पातळीवर तपास कार्यही मार्गी लावले जात आहे.अनिल देशमुख,अनिल परब,एकनाथ खडसे,अजित पवार,तर सचिन वाझेच्या आडून थेट मातोश्रीला लक्ष्य करण्याचे भाजपाचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत.यात दिवसेंदिवस भरच पडत असून आता भावना गवळींंपाठोपाठ छगन भुजबळ यांनाही नव्याने निशाण्यावर आणले आहे.केंद्र किंवा राज्य सरकारच्या तपास यंत्रणांनी झालेल्या आरोपांची शहनिशा करावी,आरोपांची खातरजमा करण्यासाठी आवश्यक तो तपास जरूर करावा.सत्य खोदून दोषींना सजेच्या कोठडीपर्यंत पोहचवावे,कायदेशीर चौकटीत पार पडलेल्या या सोपस्कारांचे खरे तर प्रत्येक जण स्वागतच करील.कारण जी नावे आज तपासाच्या रडारवर आहेत,ती अगदीच हरिश्चंद्राचे अवतार असतील असा आमचा मुळीच दावा नाही.या मंडळींवर झालेल्या आरोपांची आकडेवारी छोटी नाही,आरोपानंतर  उघड झालेल्या त्यांच्या संपत्तीचे विवरण पाहील्यानंतर मती स्तब्ध होते.आपण ते आकडे सहजासहजी लिहू शकणार नाहीत,एव्हढी संपत्ती एकएका नेत्याकडे असल्याचे आरोप होत असतील तर ते दोन्ही पक्षांच्या दृष्टीने चांगले म्हणायला हवे.दोषींना सजा तर निर्दोष निघाले तर कलंक तरी पुसला जाईल.अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे.प्रत्यक्षात ही अपेक्षाच सामान्य असल्याने कधीच पुर्णत्वास जात नाही. आरोप करणारे आणि आरोप करणारे दोघेही सत्तेची पालखी वाहणारे भोई दोघेही काचेच्या घरात राहतात याची जाणीव असल्याने उद्दिष्ट पुर्ती होईपर्यंतच आरोपांचा शंखनाद ऐकायला येतो.सामान्य नागरीकांसाठी शंभर कोटी म्हणजे धक्कादायक रक्कम आहे. राजकीय मंडळींची मुले, नातवंडे कोटींची उड्डाणे उडतात. एखाद्या व्यक्तिच्या जीवनात किती अतिरिक्त संपत्ती आवश्यक असते ? यावर मानसशास्त्रज्ञांनी पुस्तके लिहून राजकीय मंडळींना प्रबोधन करावे एव्हढा या संपत्ती बहाद्दरांचा हैदोस सुरू आहे. ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या नावाने शंख नाद होतो. या मुद्यांवर दोन्ही बाजूने राजकारण होत असले तरी  शंभर कोटींची चर्चा आणि कारवाई कशी काय होते यावर सुद्धा चिंतन करण्याची गरज आहे. सामान्य बुद्धीजीवी माणूससुद्धा आयुष्याची तडजोड कर्ज काढून आणि कंबरडे मोडेपर्यंत  हप्ते भरून संपतो. राज्यातील मंत्र्यांची संपत्ती, त्यांच्या शिक्षण संस्था, खाजगी साखर कारखाने याचा हिशेब लावला तरी अब्जावधीची संपत्ती समोर येते.गांधीजींच्या एकादश व्रतामध्ये सत्य आणि अपरिग्रह या दोन बाबींचा परिणाम आमच्या मनावर झाल्याने या सर्व राजकीय मंडळींनी गांधी वाचला नसावा  अशी साधी  सरळ शंका उपस्थित होते. शरीरश्रम आणि आपल्या कमाईतील दहा टक्के वंचितांसाठी देण्याची भूमिका गांधींनी मांडली आणि “सत्याचे प्रयोग” या पुस्तकातून मांडले. अशा एखाद्या पुस्तकाचा परिणाम या कोटींची उड्डाणे घेणार्‍या राजकीय मंडळींच्या मनावर होत नाही.  हे संपत्तीखोर  दुसरे तालीबानीच म्हटले पाहिजेत. तालीबानींच्या हातात शस्त्रे आहेत तर राज्यकर्त्यांच्या हातात सत्ता आहे एव्हढाच काय तो फरक. एकूणच सरकारमध्ये काम करणारी मंडळी असो नाही तर सरकारला पाण्यात पाहणारे विरोधक असोत एकमेकांवर केलेले आरोप कधीच सिध्द करण्याच्या भानगडीत पडत नाहीत.सजा होणे तर दुरच.आरोपांच्या शंखनादातून वातावरण तेव्हढे प्रदुषीत करतात.खरे तर शंखाच्या नादाने निर्माण होणाऱ्या लहरींनी वातावरण प्रफुल्लीत होते.सकारात्मक उर्जा निर्माण होते.त्यासाठी शंख वाजविणाऱ्या व्यक्तीचे मन आणि हेतूही शुध्द असावा लागतो.इथे मात्र तो शुध्दभाव नाहीच,शुभ ध्वनी निर्माण होण्याऐवजी द्वेष भावना पसरविणाऱ्या ध्वनी प्रसवतात. .म्हणूनच निर्माण झालेल्या प्रदुषणाने सामान्य जनतेचे हित बाधीत झाले आहे.सरकारने कारभार सुरू केला आणि कोरोना महामारीचे संकट ओढवले.त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारला मदत करण्याऐवजी या महामारीचेही राजकारण सुरू झाले.उध्दव ठाकरे सरकारविषयी असलेला द्वेष विरोधकांच्या प्रत्येक कृतीतून दिसू लागला.या महामारीच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत.जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येत  आहे.त्यातच तिसरी लाट येत असल्याची चाहूल लागल्याने सावध पावले टाकली जात आहेत.जगातील चीन, मॉरिशस, इग्लंड, न्युझिलंड, पोर्तुगाल, स्वित्झरलॅण्ड या देशामध्ये कोरोना विषाणूचा नवा सी 1.2 व्हेरिएंट आढळल्याने चिंता वाढली आहे. नॅशनल इन्स्टीट्युट फॉर कम्युनिकेबल डिसीजेस या संस्थेच्या वैज्ञनिकांनी या विषाणूंचा गंभिर धोका मेडआर ऑक्सिव्ह या वैद्यकीय पत्रिकेत व्यक्त केला आहे. हा सारा धोका ओळखून उरलेले निर्बंध मागे घेण्याचे धाडस सरकार करीत नाही.यात धार्मिक स्थळांचाही समावेश असल्याने विरोधी बाकावर बसलेल्या भाजपाने इथेही सरकारला अडचणीत आणण्याच्या हेतूने बंद असलेली मंदीरे खुली करण्यासाठी जनतेला आंदोलनास उधृक्त केले.आणि राज्यभर मंदीराबाहेर गर्दी जमवून उध्दव ठाकरे सरकारच्या नावाने शंखनाद केला.या गर्दीत भक्तीचे दर्दी किती आणि सत्तेसाठी वर्दी लावणारे किती हा आणखी वेगळ्या संशोधनाचा मुद्दा ठरावा.

COMMENTS