केंदाच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
नवी दिल्लीः केंदाच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा सोडवण्यासाठी शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आतापर्यंत जवळपास अकरा वेळा बैठका झाल्या. या बैठकांमध्ये जवळपास 45 तास चर्चा झाली; मात्र अनेक प्रयत्न करुनही हा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही. शेतकरी आणि सरकारमध्ये सहमत न झाल्याने हा मुद्दा अजूनही सोडवला गेलेला नाही. अशात आता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत.
ग्वाल्हेरमध्ये बोलताना तोमर म्हणाले, की सरकार आणि शेतकऱ्यांमधील गतिरोधक हटवण्याचा प्रयत्न केला जाईल. शेतकरी संघटनांनी हा मुद्दा सोडवण्याचा निर्णय घ्यावा. सरकार हा मुद्दा सोडवण्यासाठी मार्ग काढेल. केंद्र चर्चा करण्यासाठी तयार आहे आणि हा मुद्दा सरकारला सोडवायचा आहे. हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशासह काही राज्यांमधील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील चार महिन्यांपासून आंदोलन करत कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. हे शेतकरी तीनही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत. शेतकरी संघटना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग शेतकरी विरोधी असल्याचे सांगत आहेत, तर किमान हमी भाव आणि बाजार समित्यांबाबत लिखीत आश्वासन मागत आहेत. या मुद्द्यावर शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक बैठका झाल्या; मात्र अद्यापही तोडगा निघालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः किमान हमी भाव होता, आणि राहील, असे आश्वासन दिले आहे; मात्र यानंतरही शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम आहेत. मागणी मान्य होत नाही, तोपर्यंच आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे. याच दरम्यान शनिवारी पंजाबमधील मलोट शहरात पत्रकार परिषद घेणाऱ्या भाजप आमदारालाही शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी भाजपा आमदार अरुण नारंग यांना बेदम मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आणि नंतर तोंडाला काळे फासले.
COMMENTS