अहमदनगर/प्रतिनिधी- प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच 20% आणि 40 % अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्यांचे पगार दि
अहमदनगर/प्रतिनिधी- प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच 20% आणि 40 % अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्यांचे पगार दिवाळीपूर्वी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असल्याची माहिती शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.
मागील दीड वर्षापासून कोविड परिस्थितीत शिक्षक/शिक्षकेतरांचे पगार दरमहा उशिराने होत आहेत. गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज व इतर हफ्ते चुकल्यामुळे 4 ते 5 पाच हजार रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दिवाळी हा महाराष्ट्रासाठी मोठा सण आहे. सणासुदीच्या दिवसात ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर महिन्याचा पगार थकबाकी व महागाई भत्यासह दिवाळी सणापूर्वी होण्याबाबत तातडीने संबंधितांना आदेश व्हावेत, अशी मागणी शिक्षक भारतीच्यावतीने शिक्षक आमदार कपील पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, जालिंदर सरोदे, सुभाष मोरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत दिवाळीपूर्वी वेतन देण्याचे आदेश त्यांच्याकडून देण्यात आले, अशी माहिती गाडगे यांनी सांगितली. दिवाळी सण 4 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. माहे ऑक्टोबर 2021चे वेतन कर्मचार्यांना दिवाळी सणापूर्वी प्रदान होणे आवश्यक आहे. कोषागारात देयकांची तपासणी होऊन वेतनाचे प्रदान कर्मचार्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास 2 ते 3 दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. ही बाब विचारात घेता आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतनाची देयके कोषागारात दि.28 ऑक्टोबरपर्यत सादर करणे आवश्यक आहे. तरच कर्मचार्यांना दिवाळी सणापूर्वी वेतन प्रदान करणे शक्य होणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांनी नमूद वेळेत अधिनस्त कार्यालयांना निधीचे वितरण तसेच माहे ऑक्टोबरची वेतन देयके कोषागारात सादर करण्याबाबत सूचना निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले आहे, असेही गाडगे यांनी सांगितले.
COMMENTS