शिक्षक बँक राज्य कार्यक्षेत्र निर्णय तहकूब ; वार्षिक सभेत काहीकाळ गोंधळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षक बँक राज्य कार्यक्षेत्र निर्णय तहकूब ; वार्षिक सभेत काहीकाळ गोंधळ

नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या बहुचर्चित पोटनियम दुरुस्तीतील बँकेचे कार्यक्षेत्र राज्यभर करण्याचा विषय रविवारी तहकूब करण्यात आला.

आ.थोरात यांनी पठार भागात भेट देऊन साधला नागरिकांशी संवाद
संगमनेर औद्योगिक वसाहतीत सततच्या चोरीची घटना
राहुरी तालुक्यात दोन घरावर वीज कोसळल्याने नुकसान

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या बहुचर्चित पोटनियम दुरुस्तीतील बँकेचे कार्यक्षेत्र राज्यभर करण्याचा विषय रविवारी तहकूब करण्यात आला. बाकी पोटनियम दुरुस्ती मंजूर करण्यात आली. दरम्यान, बँकेच्या वार्षिक सभेतील दरवर्षीच्या गोंधळाची परंपरा यंदाही कायम राहिली. 

सभा ऑनलाईन असतानाही सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाच्या दुसर्‍या गटाचे दोन संचालक ऑफलाईन सभेत घुसले व त्यांनी सत्ताधार्‍यांवर चुकीचा ताळेबंद मांडल्याची तक्रार केली. मात्र, अहवाल तयार करणार्‍या डीटीपी ऑपरेटरच्या चुकीमुळे व त्याने दोन वर्षांपूर्वीच्या खर्चाचे आकडेच यंदाच्या अहवालात घेतल्याने अहवालात चुकीचे आकडे दिसत आहेत, त्यामुळे संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सत्ताधारी गुरुमाऊलीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. बँकेतील सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाची मुदत संपली आहे तसेच या मंडळातील 7 संचालक विरोधात गेले आहेत. त्यांनी तसेच विरोधकांपैकी गुरुकुल मंड़ळ, विकास मंडळ व अन्य मंडळांनीही बँकेच्या पोटनियम दुरुस्तीतील बँकेचे कार्यक्षेत्र राज्यस्तर करण्याच्या विषयाला विरोध केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य सभासदांच्या भावना लक्षात घेऊन बँकेचे कार्यक्षेत्र राज्य करण्याचा विषय पुढील सभेपर्यंत स्थगित करण्यात आला आहे, असे अध्यक्ष राजू राहाणे यांनी जाहीर केले.

बाकी पोटनियम दुरुस्तीला मंजुरी

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 101 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने झाली. सकाळी दहा वाजता सुरू झालेली सभा दुपारी तीन वाजता संपली. बँकेचा स्टाफिंग पॅटर्न कमी करणे, सर्व कर्ज प्रकरणे व मयत निधी संरक्षण, कर्ज व ठेवींवरील व्याजदरात 3 टक्के फरक ठेवून त्यावर कारभार करण्याचे निर्णय घेण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष राहाणे होते. यावेळी उपाध्यक्ष उषाताई बनकर यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. अहवाल आणि ताळेबंद मंजुरीच्या विषयावर चर्चा झाली. या चर्चेमध्ये विविध संघटनांचे प्रतिनिधी संजय कळमकर, राजेंद्र शिंदे, राजू साळवे, राजेंद्र निमसे, एल.पी. नरसाळे, मीनल शेळके, विकास डावखरे, एकनाथ व्यवहारे, बाळासाहेब सरोदे, राजेंद्र ठोकळ, संतोष वाघमोडे, विठ्ठल काळे, प्रवीण ठुबेे यांच्यासह अनेक सभासदांनी भावना आणि मते व्यक्त केली.

जुगलबंदी रंगली

विकास डावखरे व प्रवीण ठुबे यांनी ऑनलाईन सभेच्या ठिकाणी येऊन सत्ताधार्‍यांवर टीका केली. ताळेबंदात चुकीची आकडेवारी मांडल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी संचालक मंडळावर अनेक आरोप केले. त्याला उत्तर देताना गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी प्रत्युत्तर दिले. घड्याळ खरेदी माजी चेअरमनच्या निर्णयानुसार झालेली आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. शिक्षक परिषदेचे प्रवीण ठुबे यांनी रात्रीतून अहवाल बदलल्याची टीका केली. त्यावर अध्यक्ष राहाणे यांनी खुलासा केला. अहवालामध्ये प्रिंट मिस्टेक आहे. ही मानवी चूक असून यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. शिवाय ते आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकाचे आकडे आहेत. परंतु केवळ लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी विरोधकांनी अशा पद्धतीचे आरोप केले, असा दावा त्यांनी केला. गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे यांनीही विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला व त्यांनी विरोधकांच्या नेत्याची आणि स्वतःची नार्को टेस्ट करण्याची तयारी दाखवली. संचालक मंडळाच्यावतीने अध्यक्ष राहाणे तसेच बँक शताब्दी समितीचे अध्यक्ष सलीमखान पठाण, माजी उपाध्यक्ष विद्युल्लता आढाव, माजी अध्यक्ष शरद सुद्रिक, माजी उपाध्यक्ष अर्जुन शिरसाठ, संचालक सुयोग पवार आदींनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. या ऑनलाइन सभेला झूम अ‍ॅप व यू ट्यूबच्या माध्यमातून 3800 सभासदांनी हजेरी लावली. शेवटी माजी अध्यक्ष साहेबराव आनाप यांनी आभार मानले.

अखेर आले पोलिस

सभेच्यावेळी विकास डावखरे व प्रवीण ठुबे यांनी संचालक मंडळाला धारेवर धरले. यावेळी संचालक सलीमखान पठाण व विद्युलता आढाव यांनी विरोधकांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण वादंग वाढल्याने अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला व काहींना सभागृहाबाहेर काढल्यानंतर वादंग मिटले. यानंतर पत्रकारांशी बोलताना डावखरे व ठुबे यांनी सत्ताधार्‍यांवर टीका केली. आजच्या शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधार्‍यांचा पोरखेळ झालेला दिसला. ताळेबंदच बनवाबनवीचा छापून सभासंदाच्या डोळ्यात धूळफेक करणे, सर्वसाधारण सभेच्या आदल्या दिवशी रात्रीत अहवाल बदलावा लागतो, इतकी नामुष्की 100 वर्षात कधी झाली नाही. बँक जशी घडयाळे खरेदी करण्यासाठी जशी गुजरातला गेली, तसे ऑनलाईन सभेसाठी चांगले तंत्रज्ञान नगरमध्ये असताना थेट पुण्याला गेले. यांना फक्त घोटाळे घालण्यासाठी बाहेरचे पुरवठादार लागतात. कशातच पायपोस न राहिलेल्या सत्ताधार्‍यांनी आता मुदत संपलेली आहे. अजून पोरखेळ करुन बँकेची बदनामी करण्यापेक्षा पायउतार होऊन एकदाची निवडणूक घेऊन टाकावी किंवा जिल्हा उपनिबंधकांनी बँकेवर प्रशासक नियुक्त करावा, असे ते म्हणाले.

COMMENTS