भय इथले संपत नाही…  एकाच दिवसात सापडले बाराशेवर रुग्ण, लॉकडाऊनची चिन्हे वाढली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भय इथले संपत नाही… एकाच दिवसात सापडले बाराशेवर रुग्ण, लॉकडाऊनची चिन्हे वाढली

कोरोनाची रोजची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन केले आहे.

तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता चिंताजनक : ज‍िल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगडडा
स्वाभिमानी सचिव संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश रेवगडे
पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी- कोरोनाची रोजची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन केले आहे. पण तेही ढासळण्याच्या स्थितीत आहे. रविवारी एकाच दिवसात जिल्ह्यात 1228 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने जिल्ह्यात वा काही भागात लॉकडाऊनची चिन्हे दिसू लागली आहेत. भय इथले संपत नाही, अशी स्थिती जिल्ह्याची झाली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ सोमवारी नगरला येणार असल्याने त्यांनाच आता जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कड़क उपाययोजनांचा आधार घ्यावा लागणार आहे. 

जिल्हा प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत त्यावेळची अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्या 4121 लक्षात घेऊन व रुग्णवाढीचा वेग पाहून 4 एप्रिलपर्यंत 6370 रुग्ण होऊ शकतील, असा अंदाज बांधला होता व त्यानुसार ग्रामीण व नगर शहरात कोविड सेंटर, तेथील ऑक्सिजन सुविधा, आयसीयू सुविधा तसेच ग्रामीण व नगर शहरातील खासगी रुग्णालयांतील खाटांची उपलब्धता, जिल्ह्यात ऑक्सिजनची स्थिती याचा आढावा घेऊन नियोजन केले होते. पण नगर शहर व जिल्हा मिळून आठवडाभर आधीच 5242 रुग्ण झाले आहेत. 4 एप्रिल उजाडेपर्यंत अजून सात दिवस बाकी असून, रोजचे वाढते रुग्ण पाहता येत्या दोन-तीन दिवसातच सहा हजारावर रुग्ण संख्या जाण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत प्रशासनाने केलेले प्रतिबंधात्मक नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. प्रशासनासमोर वाढत्या रुग्ण संख्येने अस्वस्थता निर्माण झाली असून, ही संख्या रोखण्याचे आव्हान आहे. लॉकडाऊन केल्यावर उद्योग-व्यवसायांवर परिणाम होतो, तसेत तीन दिवस व्यवहार बंद राहिल्यावर चौथ्या दिवशी सर्व खुले झाल्यावर गर्दी वाढते तसेच लॉकडाऊन होण्याच्या भीतीने आतापासूनच दुकानांतून गर्दी सुरू होते, अशा काही कारणांमुळे लॉकडाऊन लावण्यास प्रशासन अनुत्सुक आहे. पण दुसरीकडे रुग्णांची वाढती संख्या प्रशासनासमोर नवी डोकेदुखी झाली असून, आता प्रशासनाचा पवित्रा महत्त्वाचा असणार आहे.

पालकमंत्री आज घेणार आढावा

पालकमंत्री हसन मुश्रीफ सोमवारी (29 मार्च) नगरला येणार आहेत. नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात ते कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. याशिवाय काही राजकीय बैठकाही त्यांच्या होणार आहेत. दुपारी 12 वाजता कोरोना लसीकरण, सद्यस्थिती व त्यावरील उपाययोजना याबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून, त्यानंतर दुपारी 12.45 वाजता अहमदनगर जिल्हयातील यापूर्वी व सद्यस्थितीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकर्‍यांंना द्यावयाच्या शासकीय मदतीबाबत म्हणजे आर्थिक मदत, बियाणे, खतपुरवठा, पीक कर्ज पुरवठा याबाबत आढावा बैठक घेणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यभराचा आढावा घेतल्यावर गरज असेल तेथे लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे जिल्हा प्रशासनावर याबाबतचा निर्णय सोपवला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने पालकमंत्र्यांना आता जिल्ह्यात लॉकडाऊन करायचे की नाही, याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्याच्या स्थितीत करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रशासनाने केलेले नियोजन मात्र ढासळण्याच्या स्थितीत आहे.

चौकट-

नव्या 1228 बाधितांची रुग्ण संख्येत भर

जिल्ह्यात रविवारी 857 कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 84 हजार 361 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 92.91 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, रविवारी जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 1228 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 5242 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 257, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 599 आणि अँटीजेन चाचणीत 372 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 102, अकोले 3, कर्जत 13, कोपरगाव 37, नगर ग्रामीण 8, नेवासा 12, पारनेर 4, पाथर्डी 1, राहता 38, राहुरी 2, श्रीगोंदा 13, श्रीरामपूर 2 आणि कँटोन्मेंट बोर्ड 22 अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 221, अकोले 12, जामखेड 2, कर्जत 4, कोपरगाव 52, नगर ग्रामीण 23, नेवासा 12, पारनेर 14, पाथर्डी 5, राहाता 74, राहुरी 18, संगमनेर 67, शेवगाव 6, श्रीगोंदा 10, श्रीरामपूर 54, कँटोन्मेंट 7 आणि  इतर जिल्हा 18 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 372 जण बाधित आढळून आले. मनपा 31, अकोले 12, जामखेड 45, कर्जत 42, नगर ग्रामीण 6, नेवासा 28, पारनेर 17, पाथर्डी 33,  राहाता 14, राहुरी 62, संगमनेर 17, शेवगाव 16, श्रीगोंदा 10, श्रीरामपूर 23  आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 291, अकोले 14, जामखेड 37, कर्जत 18,  कोपर गाव 76, नगर ग्रामीण 34, नेवासा 27, पारनेर 21, पाथर्डी 19, राहाता 111, राहुरी 26, संगमनेर 84, शेवगाव 15, श्रीगोंदा 6, श्रीरामपूर 52, कॅन्टोन्मेंट 15 आणि इतर जिल्हा 11 अशा रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेली रुग्ण संख्या-84361, उपचार सुरू असलेले रूग्ण-5242, मृत्यू-1192, एकूण रूग्ण संख्या-90795.

COMMENTS