भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही दिवसभर उमटत होते.आणखी बराच काळ हे निलंबन मागे घेतले जात नाही तोपर्यंत ते तसे उमटत राहणार,तो
भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही दिवसभर उमटत होते.आणखी बराच काळ हे निलंबन मागे घेतले जात नाही तोपर्यंत ते तसे उमटत राहणार,तोपर्यंत पहिल्या दिवशी विधानसभेत जे घडले त्याचे सकारात्मक नकारात्मक परिणामही चर्चेत राहतील.या घडामोडींनी कुणाला काय दिले? यावरही साधक बाधक चर्चा होत राहील.यात कुणी कुणावर मात केली या संदर्भात राजकारणातील अनिश्चित परिस्थितीमुळे निश्चित निष्कर्ष काढता येणे अशक्य असले तरी प्रथम दर्शनी स्वतःच फेकलेल्या जाळ्यात भाजप स्वतः सावज झाला हे मात्र नक्की.हा पहिला दिवस भास्कर जाधव यांच्यासह महाविकास आघाडी सरकारच्या पथ्यावर पडला.हेही तितकेच खरे.
शिकारी जाळं टाकून सावज येण्याची वाट पहात बसतो आणि जाळं टाकतांना कळत नकळत झालेली किंबहूना फाजील आत्मविश्वास शिकारीच त्या जाळ्यात अडकतो.जाळ्यात पाय अडकून धडपडतो,असाच काहीसा प्रकार विधीमंडळाच्या दोन दिवशीय अधिवेशनाच्या कामकाजात पहायला मिळाला.दोन दिवसाच्या अल्पकाळात राज्यासमोर असलेल्या अनेक आव्हानांवर महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची चांगली संधी भक्कम संख्याबळ असलेल्या भाजप सारख्या आक्रमक विरोधी पक्षाकडे होती.त्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तशी रणनिती तयार करून सरकारला कोंडीत पकडण्याचा विचारही भाजपचा होता.अर्थात यावेळी अनुभवातून बरेच काही शिकलेल्या शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा कसदार पक्षांच्या एकत्रीत सरकारसोबत सामना आहे याचे भान भाजपाला राहीले नाही.त्यातच नेहमी सत्तेचा आणि विद्वत्तेचा अहंकाराने वाढलेला फाजील आत्मविश्वासही नडला. महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राजकारण्यांसाठी एक शिकवण मागे ठेवली आहे.सावज टप्यात येईपर्यंत शिकार करायची नाही.त्या सुधाकरराव नाईक यांचा सहवास लाभलेल्या किंबहूना तावून सुलाखून निघालेल्या अनेक मंडळींसमोर भाजपची रणनिती त्यांच्यावर बुमरँग झाली आणि सरकारवर फेकायचा बाँब त्यांच्याच हातात फुटला.
तीन पक्षांच्या सरकारमध्ये तीन वेगवेगळ्या बौध्दीक क्षमतेचे आणि अनुभवसिध्द मंडळी आहेत.त्यांचा एकत्रित विचारविमर्श घेऊनच सरकारची रणनिती ठरत असते,निलंबन प्रकरणात तर ते तसेच घडले असण्याची दाट शक्यता आहे.याऊलट भारतीय जनता पक्षात फडणवीसांची दादागीरी लक्षात घेता केवळ एकबुध्दीने ठरवलेली रणनिती बहूबुध्दीसमोर सपशेल हाराकीरीची ठरली.मुळात निलंबनापुर्वी सभागृहात सरकार कुठल्या दिशेने कामकाज घेऊन जात आहे,सरकारला नक्की काय करायचे आहे,याचा अंदाज भाजपाला आला नाही.कुठल्या प्रस्तावावर विरोधी पक्ष आक्रमक होऊन सभागृहात गोंधळ करू शकतो याचा अचुक अंदाज बांधून सरकारच्या बाजूने एकएक पाऊल पुढे टाकले गेले आणि विरोधी पक्ष त्या पावलांसोबत भरकटत गेला. सरकार मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय देण्यास इच्छूक नाही.असा आभास निर्माण करून देवेंद्र फडणवीस यांना समाजात या तिन्ही पक्षांविरोधात वातावरण निर्मिती करायची होती.ही बाब हेरून सरकारच्या थिंक टँकने रणनिती ठरवून ओबीसी आरक्षणाबाबतचा केंद्राकडे पाठविण्याचा प्रस्ताव मांडण्याची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्याऐवजी विरोधी पक्षांइतकेच आक्रमक असलेले छगन भुजबळ यांच्यावर सोपवली.दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या आक्रमकतेनंतर सभागृहात होणारा संभाव्य गोंधळ हाताळता यावा म्हणून पिठासीन अध्यक्षांच्या खुर्चीवर काही मिनिटांपुर्वीच निवड झालेले शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेले भास्कर जाधव यांची वर्णी लावली.या दोन्ही खेळींकडे भाजपचे दुर्लक्ष झाले म्हणा किंवा सरकारचा डाव विरोधी पक्ष नेत्यांच्या लक्षात आला नाही म्हणा,कारण काहीही असले तरी या चक्रव्युहात विरोधी पक्ष फसला. त्यानंतर सभागृहात जे काही घडले ते साऱ्या जगाने पाहीले.गदारोळात सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव उपाध्यक्षांच्या दालनात गेले.तिथे ते स्थिरस्थावर होत असतानाच त्यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते घुश्यातच त्यांच्या दालनात शिरले.विरोधी आणि सत्ताधारी पक्षांचे काही आमदारही गेले.तिथे घडलेला सारा इतिवृत्तांतही एव्हाना जगजाहीर झाला आहे ,त्यानंतरचा सभागृहातील तसेच बाहेरच्या घडामोडीही सर्वश्रूत आहेत.दरम्यानच्या काळात घडलेले मान्य करून माफी मागीतल्याचेही विरोधी पक्ष नेते सांगतात.इथेही त्यांचा अंदाज साफ चुकला.आजवरच्या प्रथेप्रमाणे अध्यक्षांच्या दालनात घडलेल्या गोष्टी सभागृहात चर्चेत येत नाहीत.पटला नोंद केली जात नाही,या गोष्टीचीही वाच्यता होणार नाही समजूतीने देवेंद्र फडणवीस सहकारी अडचणीत आले.आणि पुढे काय झाले हे आपणा सर्वांना ठाऊक आहेच.यानंतर पुढे काय होणार हा खरा मुद्दा आहे. या निलंबन प्रक्रीयेतून महाराष्ट्राच्या निदर्शनास अनेक गोष्टी आल्या आहेत.एकतर सत्ता मिळवता आली नाही याचा पश्चाताप अजूनही भाजपला होत असावा.झालेली चुक दुरूस्त करतांना केंद्रीय सत्तेचा वापर करूनही सरकार अस्थिर होत नाही.ही बाब त्यांच्या आणखी जिव्हारी लागलेली दिसते,त्याशिवाय मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षण मुद्यावर एक बोट महाआघाडी सरकारकडे दाखविले जात असतांना केंद्र सरकारकडे दाखवली जात असलेली उरलेली चारही बोटे जास्तच छळत असावेत.त्यातूनच सभागृहात त्यांचा त्रागा व्यक्त झाला आणि आयतेच चालून आलेले सावज टिपण्याची संधी सरकारने साधली. या निलंबनामुळे सरकारच्या स्थिरतेवर उपस्थित होणारे प्रश्नचिन्ह निलंबन मागे घेतले जात नाही तोपर्यंत निकाली निघाले आहे.विरोधकांचे बळ १२ ने कमी होऊन ९४ वर आल्याने अध्यक्षपदाच्या निवडणूकीचाही मार्ग प्रशस्त झाला आहे.ओबीसी आरक्षणासाठी केंद्राकडे इम्पॕरिकल डाटा मागण्याचा प्रस्ताव तसेच मराठा आरक्षणाचा प्रस्ताव सरकारतर्फे मांडला जात असतानाच भाजपाने गोंधळ केल्याने भाजपाला या दोन्ही समाजाच्या प्रश्नांवर गांभिर्य नाही असा संदेश महाराष्ट्राला देण्यात महाविकास आघाडी सरकार यशस्वी झाले.शिवसेना आणि भाजप जवळ येत आहेत अशा उठत असलेल्या वावड्यांना विराम मिळून राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी शिवसेनेचे नाते एका पावलाने आणखी घट्ट झाले.आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे काही काळासाठी तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहाचे कामकाज चालवितांना भास्कर जाधव यांनी दाखवली प्रगल्भता आणि साकारलेली जशास तशी भुमिका त्यांच्या नेतृत्व गुणांची परिपरिपुर्णता सिध्द करण्यास पोषक ठरली.गमावण्यासारख बरेच काही असतांना महाविकास आघाडी सरकारने मात्र कमावले पण ताट भरलेले असतांनाही उपवास घडला तो भाजपाला.
COMMENTS