शब्द हेचि कातर

Homeसंपादकीयदखल

शब्द हेचि कातर

शब्द कसे असतात, त्यांची ताकद काय असते, त्यांच्यामुळं युद्ध कशी होतात, एखादा शब्द महाभारत कसं घडवतो, याचं वर्णन संत तुकारामांनी आपल्या अभंगात केलं आहे.

संसदेतील गतिरोध संपवा ! 
हे देखील महत्वाचे !
शांतताप्रिय जपान होतोय हिंसक !

शब्द कसे असतात, त्यांची ताकद काय असते, त्यांच्यामुळं युद्ध कशी होतात, एखादा शब्द महाभारत कसं घडवतो, याचं वर्णन संत तुकारामांनी आपल्या अभंगात केलं आहे. एखाद्या शब्दाची ताकद, उपद्रवमूल्य किती असतं, हे गेल्या वर्षभरात प्रकर्षानं जाणवलं आहे. राज्यकर्त्यांतही एखादा शब्द कशी धास्ती निर्माण करतो, हे आता चांगलंच समजलं आहे.

रामायण घडले। महाभारत घडले।

त्यांना कारणीभूत होते कुजके शब्द ॥

म्हणून शब्द जपावा, शब्द पुजावा।

शब्द पुसावा, बोलण्या आधी ॥

घासावा शब्द। तासावा शब्द ।

तोलावा शब्द। बोलण्या पूर्वी ॥

शब्द हेचि कातर। शब्द सुईदोरा।

बेतावेत शब्द। शास्त्राधारे ॥

बोलावे मोजके ।नेमके, खमंग, खमके ।

ठेवावे भान । देश, काळ, पात्राचे ॥

बोलावे बरे । बोलावे खरे ।

कोणाच्याही मनावर। पाडू नये चरे॥

संत तुकाराम महाराज या अभंगातून शब्दाचं महत्व सांगतात. जीवन जगण्याचं तत्वज्ञान सांगतात. शब्द हे केवळ शब्द नसतात. त्यांना वेगळं महत्त्व असतं. काही शब्दांची ताकद वेगळीच असते. शब्दांना रुप, गंध, स्पर्श असतो. शब्दाला वजन असतं. शब्दाला विश्‍वास असतो. शब्द हे शस्त्र असतं. शब्द कसे दुधारी असतात. शब्दाला कशी धार असते. शब्द कसा घात करतात. त्यामुळं तर शब्द जपण्याचा, शब्द पुसण्याचा, शब्द घासण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. एखाद्या शब्दाची दहशत असते, असं कुणी सांगितलं असतं, तर त्यावर कुणाचा विश्‍वास बसला नसता; परंतु गेले वर्षभर त्याचा अनुभव येतो आहे. लॉकडाऊन या शब्दाभोवती जनतेचं जीवन फिरलं. या शब्दानं जागतिक अर्थव्यवस्था संकटात आणली. मध्यमवर्गीय गरीब झाले. गरीब दारिद्र्यरेषेखाली गेले. किमान 15 कोटी लोकांचा रोजगार केला. असंघटित क्षेत्रातील कोट्यवधी लोक पार बुडाले. लॉकडाऊन या शब्दानं लोकांची झोप उडाली. काहींना निद्रानाश झाला. काहींवर उपचार करावे लागले. लॉकडाऊन हा शब्द मनात आला, तरी तो उच्चारण्याचं धाडस आता कुणाचं होत नाही. देशाच्या अर्थकारणाला ज्या लॉकडाऊननं ब्रेक लावला, राज्यं अडचणीत आणली, त्यांना आता तर लॉकडाऊन हा शब्दच आपल्या शब्दकोषात नको, असे वाटतं; परंतु कोरोनाचा संसर्ग थांबवायचा असेल, तर लोकांची गर्दी टाळणं महत्त्वाचं आहे. गर्दी टाळण्याचं आवाहन वारंवार करूनही जनता ऐकायला तयार नाही. स्वयंशिस्त जनतेला नको आहे. जीवित आणि अर्थ याची निवड करायची असेल, तर राज्यकर्यांना अगोदर जीवितहानी वाचवायला प्राधान्य द्यावं लागतं. त्यासाठी लॉकडाऊन करावा लागतो. लॉकडाऊन केलं, तर त्याला विरोधी पक्ष, नोकरदार, व्यापारी, उद्योजक अशा सर्वंच घटकांचा विरोध असतो. त्याचं राजकारण होतं. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी साखळी तर तोडायची, त्यासाठी बंधनंही आणायची; परंतु लॉकडाऊन हा शब्द वापरायचा नाही, असं आता सर्वंच राज्यं करायला लागली आहेत. कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर असतानाही आणि कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट, तिप्पट वाढत असतानाही देशभरातील राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलेला नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशभर लॉकडाऊन करणार नाही, असं स्पष्टच सांगून टाकलं आहे. अनेक राज्यातील मुख्यमंत्री लॉकडाऊन हा शब्द वापरताना कचरत आहेत. त्याऐवजी कोरोना कर्फ्यू, जनता कर्फ्यू, संचारबंदी, ब्रेक द चेन आदी शब्दांचा वापर करत आहेत. शब्द काहीही वापरले, तरी परिणाम लॉकडाऊनचाच असतो; परंतु एखाद्या शब्दाची धास्तीच इतकी असते, की तो वापरण्याचं धाडस होत नाही.

महाराष्ट्रात आतापर्यंत 35 लाख 19 हजार 208 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात दिवसाला 60 हजाराहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळं सरकारनं ’ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात अनेक निर्बंध लादले आहेत. राज्यात एक मे पर्यंत म्हणजे 15 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात सर्व काही बंद ठेवण्यात येणार आहे. एक प्रकारचा हा लॉकडाऊनच आहे; परंतु त्याला लॉकडाऊन हे नाव दिलेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनऐवजी संचारबंदी हा शब्द वापरला आहे. दिल्लीतही गेल्या 24 तासांत 13 हजार 868 रुग्ण सापडले आहेत. दिल्लीतील कोरोना रुग्णांचा आकडा 75 हजारांपेक्षाही पुढं गेल्यानं दिल्ली सरकारनं रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. रात्री दहा वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. त्याशिवाय सरकारनं अनेक निर्बंधही घातले आहेत. सभा, संमेलनं आणि सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयं बंद करण्यात आली आहेत. लग्नापासून ते अत्यंविधीपर्यंतच्या उपस्थितींना लगाम लावला आहे. तसंच हॉटेलपासून मेट्रो आणि बस प्रवासातील संख्येलाही चाप लावण्यात आला आहे. केजरीवाल यांनीही रात्रीच्या संचारबंदीच्या नावाखाली सर्व प्रकारचे निर्बंध घातले आहेत. लॉकडाऊन सारखेच हे निर्बंध आहेत; मात्र केजरीवाल यांनीही त्याला लॉकडाऊन हे नाव दिलेलं नाही.

मध्य प्रदेशात रुग्णसंख्या 35 हजारांवर गेली आहे. गेल्या 24 तासांत मध्य प्रदेशातील चार बड्या शहरांमध्ये चार हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं भोपाळमध्ये सात दिवसांचा कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. तसंच संपूर्ण राज्यातही अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यात कोरोना संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास राज्यात 144 कलम लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत; मात्र त्यांनीही थेट लॉकडाऊन हा शब्द वापरला नाही. त्यांनी त्याला ’कोरोना कर्फ्यू’ असं म्हटलं आहे. राजस्थानातही कोरोनाच्या केसेस वाढल्यानं जनता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी राज्यातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. तसंच लॉकडाऊनसारखे निर्बंध असणारी नियमावली तयार करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. जनता संचारबंदीच्या नावाखाली हे निर्देश लागू केले जाणार आहेत. उत्तर प्रदेशातही कोरोनाचा कहर वाढला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनाही कोरोना झाला आहे. राज्यात कोरोनाचा कहर वाढल्यानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कलम 144 लागू केलं आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा कहर वाढत असतानाही राज्य सरकार आणि मोदी सरकार संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची हिंमत दाखवत नाही. कारण गेल्यावेळी मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन लागू केला होता. तेव्हा त्यावर विरोधी पक्षानं प्रश्‍न उपस्थित केले होते. सर्वांनीच लॉकडाऊनला विरोध केला होता. त्यामुळंच सर्व राज्यातील सरकारकडून लॉकडाऊन हा शब्द वापरणं टाळलं जात आहे.

COMMENTS