मुंबई/प्रतिनिधी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध कठोर केले असून, यात रात्री नाईट कर्फ्यू तर दिवसा संचारबंदी लागू केली आहे. यात व्या
मुंबई/प्रतिनिधी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध कठोर केले असून, यात रात्री नाईट कर्फ्यू तर दिवसा संचारबंदी लागू केली आहे. यात व्यायामशाळा ब्युटी पार्लरवर देखील कठोर निर्बंध लादले होते. मात्र राज्य सरकारच्या या नियमांविरोधात तीव्र असंतोष उमटल्यानंतर रविवारी दुपारी राज्य सरकारने सुधारित नियमावली जाहीर करत, यात व्यायामशाळा आणि ब्युटी पार्लरसाठी नियमांत शिथीलता केली आहे.
या नवीन आदेशानुसार, ब्युटी पार्लरला आणि जिमला 50 टक्के क्षमतेने परवानगी असणार आहे. दोन डोस घेतलेल्यांनाच या ठिकाणी जाता येणार आहे. राज्य सरकारने आपल्या सुधारित आदेशात म्हटले, ब्युटी पार्लरचा देखील हेअर कटिंग सलूनसोबत समावेश केला जात आहे. यानुसार ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहू शकतील. ज्या गोष्टींमध्ये तोंडाचा मास्क काढण्याची आवश्यकता नाही त्याच गोष्टी ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये करता येतील. हे काम करणार्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. याशिवाय ज्या ग्राहकांचे लसीकरण झाले आहे त्यांनाच येथे प्रवेश असेल. कोरोनाच्या रुग्णांची संख्या 2 ते 3 दिवसात दुप्पट होण्याचं प्रमाण महाराष्ट्रात होतं आहे. काल पर्यंत 40 ते 45 हजार रुग्णांची वाढ होत असल्याने असे निर्बंध लावणे क्रमप्राप्त असल्याचे राजेश टोपे यांनी लागू होत असलेल्या निर्बंधावर स्पष्टीकरण दिले. आता दिवसा जमावबंदी तर रात्री नाईट कर्फ्यु, शाळा कॉलेजेस पूर्णतः बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी परीक्षा वेळेवरच होतील असेही टोपे म्हणाले. रेस्टॉरंट, सिनेमा हॉल 50 टक्के क्षमतेत चालवावे, स्पा सलूनदेखील 50 टक्के क्षमतेने चालवावे. अंतर राष्ट्रीय प्रवास करणार्या प्रवाशांना 7 दिवस विलगिकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला असून लग्न, अंत्यसंस्कार यासाठीही जे आकडे ठरवले आहेत त्याचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी केले.
… तर धार्मिक स्थळे आणि दारु दुकानांवर येेणार निर्बंध
राज्य सरकारने शनिवारी केलेल्या निर्बंधामध्ये धार्मिक मंदिरांचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे धार्मिक स्थळे नियमांसह सुरूच राहणार असून, दारुची दुकाने देखील सुरूच राहणार आहेत. यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, यामुळे गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा इशारा टोपे यांनी दिला आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल तर त्याबाबतही टप्प्याटप्यानं निर्णय घेण्यात येईल असे टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात ऑक्सीजनची मागणी नगण्य वाढली असून दखल घेण्यासारखी ही मागणी नाही असेही त्यांनी सांगितले.
COMMENTS