सहायक निरीक्षक सचिन वाझेंभोवतीचा फास आणखीच आवळला गेला आहे.
मुंबई/प्रतिनिधी: सहायक निरीक्षक सचिन वाझेंभोवतीचा फास आणखीच आवळला गेला आहे. वाझेंच्या घरात 62 जिवंत काडतुसे सापडली आहेत. ही काडतुसे घरात का ठेवली होती, याचे उत्तर वाझे देत नसल्याचे एनआयएने विशेष न्यायलयात सांगितले. वाझेंकडे ही काडतुसे आली कुठून? आणि त्यांनी ही काडतुसे का ठेवली आहेत? याबाबतचे गूढ वाढले आहे.
वाझेंची कोठडी संपत असल्याने त्यांना एनआयएच्या विशेष न्यायालयात आणण्यात आले होते. वाझेंना पोलिस अधिकारी म्हणून सरकारी कोट्यातून 30 जिवंत काडतुसे देण्यात आली होती. तसेच त्यांना एक रिव्हॉल्वर देण्यात आले होते. 30 पैकी पाच बुलेट्स वाझेंकडे आहेत; मात्र 25 काडतुसे गायब आहेत. ही 25 काडतुसे कुठे गेली याबाबत वाझे काहीही माहिती देत नसल्याचेही एनआयएने न्यायालयात सांगितले. या वेळी एनआयएने वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगितले. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांना वाझेंच्या समोर बसवून तपास करायचा आहे. त्यामुळे वाझेंची कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी एनआयएने केली आहे. त्याशिवाय वाझेंच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्याचा अहवाल यायचा बाकी आहे. वाझेंच्या गाडीतून मिळालेले पुरावे फॉरेन्सिक पुराव्याशी पडताळणी करून पाहायचे आहे. डीएनए मॅच करण्यासाठी पाचही गाड्यांचे सँपल घेण्यात आले आहेत. शिवाय आरोपीने सीसीटीव्ही डीव्हीआर गायब केला असून तोही शोधायचा आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी आरोपीने 12 लाख रुपये दिले होते. त्याचीही माहिती घ्यायची असल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले. याशिवाय वाझेंच्या आवाजाचे नमुनेही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
COMMENTS