लाचखोरी! व्यवस्थेतील अपरिहार्य परंपरा……

Homeताज्या बातम्यासंपादकीय

लाचखोरी! व्यवस्थेतील अपरिहार्य परंपरा……

सार्वजनिक बांधकाम विभागातील चिखलीकर,पवार,आठ कोटींची लाच घेणारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशी नाना उदाहरणे देता येतील.लाचखोरीचा विसर पडला की मंडळी पुन्ह

अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांनी साधला आस्थेवाईकपणे संवाद
संविधानाशी विसंगत वर्तन आणि…
बहुआयामी व्यक्तीमत्व

सार्वजनिक बांधकाम विभागातील चिखलीकर,पवार,आठ कोटींची लाच घेणारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशी नाना उदाहरणे देता येतील.लाचखोरीचा विसर पडला की मंडळी पुन्हा सेवेत पुनर्स्थापित होते.पुन्हा तोच सन्मान आणि लाचखोरीचा तोच निर्लज्जपणा.सध्या चर्चेत असलेले नाशिक जिल्हा परिषदेतील आठ लाखाच्या लाचखोरीचे प्रकरणाची जातकुळीही यापेक्षा वेगळी नाही.म्हणूनच बाईपणाचा कायदेशीर फायदा उचलून फरार झालेल्या या महिला शिक्षणाधिकाऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही,नाही म्हणायला महिना दोन महिने फारफार तर सहा महिने शासकीय सेवेचा विजनवास भोगावा लागेल.

शे पाचशे रूपयांसाठी शिपाई नोकरी गमावून बसतो,साहेब मात्र लाखो करोडोंची डील करून ऐषोरामात निवृत्तही होतो.आणि दुर्दैवाने नोकरीत असतांना पकडला गेलाच तर जाळे टाकणारी व्यवस्थाच जाळ्याला असलेल्या छिद्रांमधून सावजाला बाहेर पडण्याची सोय करते.अशी असंख्य उदाहरणे आपल्या भवताली आहेत.नावानिशीच उल्लेख करायचा झाला तर सार्वजनिक बांधकाम विभागातील चिखलीकर,पवार,आठ कोटींची लाच घेणारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशी नाना उदाहरणे देता येतील.लाचखोरीचा विसर पडला की मंडळी पुन्हा सेवेत पुनर्स्थापित होते.पुन्हा तोच सन्मान आणि लाचखोरीचा तोच निर्लज्जपणा.सध्या चर्चेत असलेले नाशिक जिल्हा परिषदेतील आठ लाखाच्या लाचखोरीचे प्रकरणाची जातकुळीही यापेक्षा वेगळी नाही.म्हणूनच बाईपणाचा कायदेशीर फायदा उचलून फरार झालेल्या या महिला शिक्षणाधिकाऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही,नाही म्हणायला महिना दोन महिने फारफार तर सहा महिने शासकीय सेवेचा विजनवास भोगावा लागेल.त्यानंतर पुन्हा मुळ सेवेत रूजू होऊन दुकान थाटणे शक्य होणारच आहे.
शिक्षण क्षेत्रातल्या बाजारात सुरू झालेल्या उठवळगीरी किती टोकाला गेली आहे,याचे निर्लज्ज उदाहरण म्हणून नाशिकच्या या प्रकरणाकडे पहायला हवे.अर्थात शिक्षण क्षेत्रातील अशा लाचखोरीचे हे पहिले प्रकरण नाही,याआधीही शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयातील लाचखोरीने कळस गाठून त्यासंदर्भात गुन्हेही दाखल झाले आहेत.अगदी निवृत्तीच्या आदल्या दिवशीही लाच स्वीकारल्यामुळे निलंबनाची नामुष्की ओढवल्याचे प्रकरण ताजे आहे,या उपसंचालकांच्या अनेक तक्रारी होऊन पुणे आणि नाशिकमध्येही बोभाटा झाला आहे.नाशिकच नव्हे तर प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात रोज असे व्यवहार होत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.अपंग शिक्षकांचा प्रश्न असेल अथवा संस्था अनुदानाची मंजूरी असेल धुळे नंदूरबार जळगाव अहमदनगर नाशिक या जिल्ह्यांमध्ये भयानक परिस्थिती आहे.एखाद दुसरे वीर पकडले गेले म्हणून ही लाचखोरी थोपेल असा समज कुणी करणार असेल तर धादांत मुर्खपणा ठरू शकतो,कारण भातूकलीच्या खेळातील चोर पोलीसाच्या खेळा इतका हा खेळ लाचखोर आणि एसीबीमध्ये  खेळला जात असतो.म्हणून आठ लाखाची रोकड घेतांना नाशिकच्या वीरांना पकडले गेले असले तरी ड्रायव्हर आणि एक प्राथमिक शिक्षकाचा बळी देऊन ज्यांच्यासाठी ही लाचखोरी झाली त्या शिक्षणाधिकारी केवळ महिला आहेत म्हणून स्वतःला अटकेपासून वाचविण्यात यशस्वी झाल्या आहेत.सहा नंतर महिला संशयीताला अटक करता येत नाही,या कायदेशीर तरतूदीचा फायदा उपटून या प्रमुख संशयीत सुर्याचे दर्शन होण्याआधीच परागंदा झाल्या.फरार कालावधीत त्या अटक पुर्व जामीन मिळविण्यात यशस्वी होतीलही,लटकतील ते ड्रायव्हर आणि तो प्राथमिक शिक्षक.वैशाली वीर झनकर यांना सहा नंतर अटक करणे कायद्यामुळे शक्य नव्हते,हे क्षणभर मान्य केले तरी या तरतूदीचा फायदा त्या लाटणारच नाहीत असा विश्वास एसीबीच्या सक्षम अधिकाऱ्यांमध्ये कुठून आला हा मात्र या प्रकरणात संशयाचा म्हणूनच संशोधनाचा म्हणजे सखोल तपासाचा मुद्दा आहे.मात्र या खोलात व्यवस्था जाणार नाही.नियमित वेतन सुरू करण्याचा कार्यादेश काढून देण्याच्या मोबदल्यात 8 लाखाची लाच स्वीकारतांना नाशिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर – वीर यांना लाच लुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. परंतु या प्रकरणात मुख्य फरार संशयीताला विशेष झळ बसणार नाही हे खात्रीपुर्वक सांगण्याचे धाडस आम्ही या ठिकाणी करीत आहोत.
20 टक्के अनुदान मंजूर झालेल्या शाळेला नियमित वेतन सुरू करण्यासाठीचा कार्यादेश काढून देण्यासाठी 8 लाख रूपयांची लाच घेतांना सापळा रचून ठाणे एसबीने ही कारवाई केली आहे. वैशाली झनकर या मागील दोन महिने धुळे शिक्षणिकारी कार्यालयात प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यावेळी त्यांनी 10 दिवसांत विशेष प्रकरणांवर सह्या करण्यासाठी दहा दिवसात 90 लाखांची कमाई केली होती, अशी चर्चा धुळे आणि नाशिक जिल्ह्यातही आता सुरू आहे.नाशिक जिल्हा परिषदेतही या महिला शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीबाबद अनेक तक्रारी आहेत.जिल्हा परिषद सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही यासंदर्भात अवगत केले असतानाही त्यांना पदावरून हटविण्याचे धाडस झाले नाही इतकेच काय तर एसीबीच्या या सापळ्याबाबद स्वतः महिला शिक्षण अधिकाऱ्यांना सुगावा लागला असतानाही लाच घेण्याचे धाडस दाखवली यावरून या पदस्थांची मजल कुठवर असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.एकूणच शिक्षण क्षेत्रात सर्वत्र आलबेल सुरू असल्याने वैशाली झनकर वीर या अधिकाऱ्यांना फार मोठे दिव्य पार करावे लागण्याची सुतराम शक्यता दिसत नाही.

COMMENTS