राज्यासहित पुण्यातही कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे.
पुणे/प्रतिनिधी: राज्यासहित पुण्यातही कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांचे नातेवाइक या इंजेक्शनसाठी सर्वच रुग्णालयात चौकशी करत आहेत. अशा परस्थितीत रुबी हॉल क्लिनिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रुबी हॉलकडून रेमडेसिवीरसाठी नागरिकांची नावनोंदणी करून घेण्यात आली होती. इंजेक्शन आज सकाळी मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु सकाळी इंजेक्शन घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. रबी हॉल क्लिनिकच्या बाहेर जवळपास दोनशेहुन अधिक जण इंजेक्शनसाठी जमा झाले होते. नागरिकांनी इंजेक्शन का मिळणार नाही असा प्रश्न उपस्थित केला असता, रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी आम्ही इंजेक्शन राखीव ठेवले आहेत. ते तुम्हाला देऊ शकत नाही, असे उत्तर रुग्णालय प्रशासनकडून देण्यात आले. त्यावरून मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता; परंतु शेवटी पोलिसांनी सर्व नागरिकांना विनंती करून बाहेर पाठवले. पर्याय नसल्याने नागरिकांना रुग्णालयाबाहेर थांबता आले नाही. सद्यस्थितीत प्रशासन रेमडेसिवीर पुरवण्याचे आश्वासन देत आहे; मात्र प्रत्यक्षात कुठेही रुग्णालयात ते उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालये इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे स्पष्टपणे सांगत आहेत. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना अनेक ठिकाणी चकरा मारूनही नकाराचे उत्तर मिळत आहे.
COMMENTS