राज्यातील बंद उद्योगांना मिळणार ‘अभय’ : सुभाष देसाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील बंद उद्योगांना मिळणार ‘अभय’ : सुभाष देसाई

राज्याच्या उद्योग विभागाने बंद उद्योगांसाठी विशेष अभय योजनेची तयारी केली आहे. सुक्ष्म, लघु, मध्यम वर्गवारीतील उत्पादक घटकांना ही योजना लागू असेल.

शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेमध्ये लगीनघाई सुरू l पहा LokNew
खुन करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस कोपरगाव पोलीसांकडुन अटक
फोटोकॉपी व्हेंडर्समध्ये कॉपीराइट संबंधी जागरुकतेचा प्रसार

मुंबई, दि. ८ : राज्याच्या उद्योग विभागाने बंद उद्योगांसाठी विशेष अभय योजनेची तयारी केली आहे. सुक्ष्म, लघु, मध्यम वर्गवारीतील उत्पादक घटकांना ही योजना लागू असेल. या योजनेद्वारे बंद पडलेल्या उद्योगांचे पुनरुज्जीवन होऊन रोजगार वाढीला चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

    प्रस्तावित अभय योजनेसंबंधी उद्योगांच्या सूचना समजून घेण्यासाठी आज देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करण्यात आली. यावेळी विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे, अंबरनाथ, तळोजा, अंबड, सिन्नर आदी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी व औद्योगिक संघटनांनी भाग घेऊन काही सूचना केल्या. यामध्ये सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे संचालक नामकर्ण आवारे, पिंपरी चिंचवड औद्योगिक संघटनेचे कार्याध्यक्ष गोविंद पानसरे, विदर्भ औद्योगिक संघटनेचे सुरेश राठी, लघु, मध्यम उद्योग संघटनेचे प्रदीप पेशकार यांचा समावेश होता.

विविध उद्योजक संघटनांनी केलेल्या या सर्व सूचनांची दखल घेऊन नवी योजना तयार करण्यात यावी, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विभागातील अधिकाऱ्यांना दिले. विशेष अभय योजनेमध्ये बंद असलेल्या उद्योग घटकांकडे शासकीय देणी थकित असल्यास त्या रक्कमेवरील दंड व व्याज पूर्णपणे माफ करून औद्योगिक मालमत्ता नवीन खरेदीदारांकडे हस्तांतरित करण्यासाठी ही योजना सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला. यापूर्वी २०१६ मधील अशा अभय योजनेचा २८७ उद्योगांनी लाभ घेतला आहे. प्रस्तावित विशेष अभय योजना उद्योगस्नेही असेल. रोजगार गमावलेल्या कामगारांना या योजनेद्वारे रोजगार उपलब्ध होईल, देशातील इतर राज्य देखील या योजनेचे अनुकरण करतील, असा विश्वास श्री.देसाई यांनी व्यक्त केला. आजच्या बैठकीला उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, सह सचिव संजय देगांवकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS