भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तर ओडिशामध्ये असणार्या धामरा बंदर आणि बालासोरदरम्यान ’यास’ चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे.
कोलकाता, भुवनेश्वर : भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तर ओडिशामध्ये असणार्या धामरा बंदर आणि बालासोरदरम्यान ’यास’ चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्यामध्ये लोकांच्या कार बुडताना दिसत आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ’यास’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एक कोटी जनता प्रभावित झाल्याचे म्हटले आहे.
बॅनर्जी यांनी ’यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा दक्षता समित्या आणि अन्य अधिकार्यांसोबत आढावा बैठक घेतली. 15 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये तीन लाखांपेक्षा जास्त घरांची पडझड झाली आहे. ’यास’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले असून धमरा ते बालेश्वर दरम्यान समुद्रकिनार्यावर पोहोचले आहे. बालासोडच्या दक्षिणेकडे सरकताना त्याचे अतितीव्र चक्रीवादळामध्ये रुपांतर होण्याची शक्यता असून उद्या सकाळपर्यंत ते झारखंडच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पूर्व मिदनापूर, दक्षिण आणि उत्तर 24 परगणा भागांचा दौर्या करणार असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. याशिवाय, चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागातील लोकांना दिलासा देण्यासाठी एक कोटी रुपयांंची मदत त्यांनी जाहीर केली आहे. सध्या या वादळाची गती 135 किलोमीटर प्रतितास असून त्याची गती 155 किलोमीटर प्रतितास होण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळाचा प्रकोप पाहायला मिळाला. दक्षिण 24 परगण्यात एक जेसीबी पाण्यात बुडाला. येथील लोकांच्या मदतीसाठी हा जेसीबी आणण्यात आला होता. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टी भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जोरदार वार्यांमुळे उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील नैहाती आणि हलिहारमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले. ओडिशात ’यास’ चक्रीवादळामुळे भद्रक जिल्ह्यातील धामरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे धामरा जिल्ह्यात मोठे नुकसान झालेले आहे. राष्ट्रीय आपत्तीव निवारण दलाच्या टीम्स बचावकार्य करत आहेत. वादळामुळे कोसळलेली झाड हटवण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. ओडिशामध्ये किनार्यावरील बोटी, दुकाने, पोलिसांची बॅरिकेट्स यांचे उदयपूरजवळ नुकसान झाले आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या बार्डरवरील पोलिसांचे बॅरिकेटस उडून गेली आहेत.
नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
हवामान विभागाने दिलेल्या वृत्तानुसार हे चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत आहे. ’यास’ चक्रीवादळाने आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ओडिशा राज्यातील भद्रक जिल्ह्यातील भ्रमक येथे धडक दिली. त्यावेळी या ठिकाणी उंच लाटा आणि सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पाऊस सुरु होता. दरम्यान ओडिशा राज्यातील काही जिल्ह्यात वारे प्रतितास 60 ते 70 इतक्या वेगाने वाहात आहे, तर पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर आणि दक्षिण 24 परगना येथे तटीय परिसरात चक्रीवादळामुळे पाणी शिरले आहे. नद्यांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे.
किनारी भागात मोठे नुकसान
ओडिशातील धामरा बंदर आणि बालासोरदरम्यान ’यास’ चक्रीवादळाचा तडाखा बसला. या भागामध्ये तब्बल 120 ते 140 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणार्या वार्यांनिशी हे चक्रीवादळ धडकले. त्यामुळे किनारी भागात असणार्या घरांचे आणि नागरी सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागात थैमान घातल्यानंतर आता चक्रीवादळाने झारखंडच्या दिशेने मोर्चा वळवला आहे.
COMMENTS